मुंबई : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी 43.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.
भारताकडून केएल राहुलने नाबाद 64 धावांची खेळी केली. राहुलशिवाय हार्दिक पंड्याने 36 धावांची खेळी खेळली. दोघांनी 5व्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एकवेळ भारतीय संघ 86 धावांच्या स्कोअरवर 4 विकेट गमावून संघर्ष करत होता. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारा आणि करुणारत्ने यांनी 2-2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर हतबल दिसत होता आणि केवळ 215 धावा करून सर्वबाद झाला होता. श्रीलंकेसाठी नवोदित नुवानिडू फर्नांडोने 50, तर कुसल मेंडिसने 34 धावा केल्या. एके काळी 177 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेने 8 विकेट गमावल्या होत्या, पण शेवटी ड्युनिथ वेलगेने 32 धावांची इनिंग खेळून श्रीलंकेची धावसंख्या 215 पर्यंत नेली.
भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी 3-3 बळी घेतले. याशिवाय उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली. 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत असलेल्या टीम इंडियाला त्या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते.