IND vs SL : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 साठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. तर दुसरीकडे कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळावी असा प्रस्ताव श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिला होता मात्र हा प्रस्ताव बीसीसीआयने फेटाळल्याचे वृत्त आहे.
श्रीलंका क्रिकेटने बीसीसीआयकडे (BCCI) दौरा वाढवण्याचा आणि त्यात टी20 सामन्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारताच्या सहभागामुळे मोठा आर्थिक फायदा होईल, अशी आशा एसएलसी (SLC) बोर्डाला होती. श्रीलंकेचा दौरा आणि भारताची पुढील आंतरराष्ट्रीय मालिका यांच्यात साधारण दोन आठवड्यांचे अंतर आहे. याचमुळे श्रीलंका क्रिकेटने तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्याची विनंती केली होती.
भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका नाही
‘स्पोर्टस्टार’च्या (Sportstar) वृत्तानुसार, भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि वर्कलोड यांचे कारण देत बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळला. वृत्तात म्हटले आहे की, “सूत्रांनी दुजोरा दिला आहे की दोन्ही बोर्डांमधील चर्चेदरम्यान बीसीसीआयने स्पष्ट केले की ते या प्रस्तावावर पुढे जाऊ शकत नाहीत. मात्र, भविष्यात अशा प्रकारची मालिका आयोजित करण्याची शक्यता भारतीय बोर्डाने पूर्णपणे नाकारलेली नाही.”
कसोटी मालिका कधी होणार?
भारतीय संघ केवळ ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’वर लक्ष केंद्रित करून श्रीलंकेचा दौरा करेल. 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत कसोटी मालिका आयोजित करण्याचे नियोजन आहे. वृत्तानुसार, एक सामना ‘गाले इंटरनॅशनल स्टेडियम’वर आणि दुसरा सामना ‘एसएससी (SSC) ग्राउंड’वर खेळवला जाऊ शकतो.
