India’s impressive entry into the final of the U-19 World Cup : भारतीय क्रिकेट संघाने अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव करत आपली अंतिम फेरीची वाट निश्चित केली. अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र, वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीमुळे हे लक्ष्य भारतीय संघासाठी ठेंगणं ठरलं. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे सामन्याचं पारडं लवकरच भारताच्या बाजूने झुकलं.
भारताने 41.1 षटकांतच हे लक्ष्य पूर्ण करत 7 गडी राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार असून, भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता. भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी भक्कम केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशीने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही.
झेडपी व पंचायत समिती निवडणुकीची प्रचार सांगता; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून निर्देश जारी
दुसऱ्या बाजूला एरॉन जॉर्जने संयमी आणि परिपक्व फलंदाजी करत शेवटपर्यंत खेळत राहिला. त्याने 104 चेंडूत 115 धावांची शानदार खेळी साकारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 4 गडी गमावत 310 धावा केल्या. उस्मान सादत आणि खालिद अहमदझाई यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. दीपेश देवेंद्रनने खालिद अहमदझाईला 31 धावांवर बाद करत ही भागीदारी मोडीत काढली.
यानंतर उस्मान सादत आणि फैसल शिनोजादा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या. पुढे फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढवत तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 148 धावांची भागीदारी केली. फैसल शिनोजादाने 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या, तर उजैरुल्लाह नियाझाईने 86 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. आता अंतिम फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा रोमहर्षक सामना पाहायला मिळणार आहे.
