Download App

भारताचं श्रीलंकेसमोर 391 रन्सचं टार्गेट, कोहलीची 166 धावांची ‘विराट’ खेळी

तिरुवनंतीपुरम : ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं आहे.

टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि 38 धावांचं योगदान दिलं.

सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित आणि शुभमन यांनी आधी उत्तम सुरुवात करुन दिली. पण रोहित 46 धावा करुन बाद झाला. त्यानंतर 116 धावांवर शुबमन गिल तंबूत परतला. त्याने 97 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकत 116 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने कोहलीची साथ दिली.

कोहलीही तुफान फटकेबाजी करु लागला आणि 85 चेंडूत त्याने शतक पूर्ण करत 74 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार ठोकत नाबाद 166 धावा केल्या. अय्यरने 38 धावांचं योगदान दिलं.

कोहलीनं आज केलंल त्याचं हे 46 वं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. सचिनने 49 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकं ठोकल्यामुळे कोहली आता सचिनच्या वन-डे शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

कोहलीने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर रिकी पॉंटिंग याला मागे टाकलं होतं. रिकीने 71 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून कोहलीच्या नावावर आता 74 शतकं झाली आहेत.

त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर (100 शतकं) आहे. याशिवाय सध्या खेळणाऱ्यांमध्ये कोणता खेळाडू कोहलीच्या आसपासही नाही. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 45 शतकांवर असून कोहलीच्या फक्त एकदिवसीय शतकांचा विचार केला तरी तो वॉर्नरच्या पुढे आहे.

Tags

follow us