Download App

धोनीची चेन्नईच ‘किंग’, पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद, जडेजा ठरला विजयाचा हिरो !

  • Written By: Last Updated:

IPL Final 2023: अखेरच्या चेंडूपर्यंत थरार झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रवींद्र जडेजा हा विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकातील दोन चेंडूत सलग षटकार आणि चौकार मारत चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.


असे रंगले शेवटचे षटक

चेन्नईला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज मोहित शर्माने शेवटचे षटक टाकताना पहिला चेंडू निर्धाव टाकला.दुसरा चेंडूवर एकच धाव दिली. मोहित शर्माने सलग तिसरा चेंडू यॉर्कर टाकला. त्यात एक धाव निघाली. शेवटच्या तीन चेंडूत चेन्नईला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर मोहित शर्माने एक धाव दिली. पुढच्याच चेंडूवर जडेजाने एक षटकार मारला. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी एका चेंडूत चार धावा हव्या होत्या. जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने पाच गड्यांच्या बदल्यात हा सामना जिंकला आहे. जडेजाने सहा चेंडूत पंधरा धावा केल्या. त्यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे.

गुजरातने चेन्नईसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले होते. पहिल्या षटकाचे तीन चेंडू टाकल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे वेळ वाया गेल्याने पंचांनी चेन्नईसमोर 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवेन कॉनव्हे यांनी पहिल्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. गायकवाडला नूर अहमदला 26 धावांवर बाद केले. त्याचपाठोपाठ कॉनव्हेला नूरने बाद केले. कॉनव्हेने 47 धावा केल्या. सातव्या षटकात चेन्नईचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.

त्यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली. सुरुवातीलाच अजिंक्य रहाणेने एकाच षटकात दोन खणखणीत षटकार मारले. दहा षटकांत चेन्नईचा दोन बाद 112 धावा झाल्या होत्या. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या पाच षटकांत 59 धावांची आवश्यकता होती. 11 व्या षटकात अजिंक्य रहाणेला मोहित शर्माने झेलबाद केले. रहाणेने 13 चेंडूत 27 धावा केल्या. त्यात त्याने दोन षटकार आणि दोन चौकार मारले. त्यानंतर शिवम दुबेने बाराव्या षटकात राशिद खानला सलग दोन षटकार मारले. तेथून चेन्नईची विजयाची वाटचाल सुरू झाली. विजयासाठी चेन्नईला शेवटच्या तीन षटकांत 38 धावांची आवश्यकता होती. अंबाती रायडूने तेराव्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तर तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारला.

परंतु चौथ्या चेंडूवर अंबाती रायडूला मोहित शर्माने बाद केले. अंबातीने 8 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार धोनीला शून्यावरच मोहित शर्माने तंबूत परतविले. त्यामुळे सामन्यात जोरदार चुरस निर्माण झाली. सामना गुजरातच्या बाजूने झुकला होता. जडेजा हा फलंदाजीला आला.


साई सुदर्शनची तडाखेबाज खेळी व्यर्थ

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्सने (GT) 20 षटकांत 4 गड्यांच्या बदल्यात 214 धावा केल्या.ऋद्धिमान साहाने 54 आणि साई सुदर्शनने गुजरातकडून 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने दोन तर दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी 32 चेंडूत पूर्ण झाली. पहिल्या 6 षटकांअखेर गुजरातने कोणतेही नुकसान न करता 62 धावा कुटल्या. गुजरातला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने 7 व्या षटकात बसला. रवींद्र जडेजाने गिलला 39 धावांवर तंबूत परतविले.यानंतर ऋद्धिमान साहाला साई सुदर्शनची साथ मिळाली. दोघांनी मिळून रनरेट अजिबात कमी होऊ दिला नाही. गुजरात संघाने 10 षटकांत एक गडी गमावून 86 धावा केल्या. वृद्धिमान साहाने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 131 धावांवर गुजरातला साहाच्या रूपाने दुसरा धक्का बसला. तो 39 चेंडूत 54 धावांची खेळी करून बाद झाला.साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 42 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली.

Tags

follow us