Manu Bhakar Khelratna Award : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडू मनु भाकरने (Manu Bhakar) शूटिंगमध्ये दोन ब्रॉन्ज मेडल जिंकत इतिहासाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीनंतर मनु भाकरवर देशभरातून कौतुकाचा जोरदार वर्षाव करण्यात आला. मात्र, आता देशाचं नाव उंचावणारी मनु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कोणत्या विशेष कामगिरीमुळे नव्हे तर, देशाचा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पुरस्काराच्या (Khelratna Award) यादीतून तिचं नाव वगळण्यात आल्याच्या चर्चांमुळे. हा विशेष पुरस्कार काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे आणि खेळाडूंची निवड नेमकी कशी केली जाते यावर एक नजर टाकूया…
विनोद कांबळीला नेमका कोणता आजार? मेडिकल अहवालातून धक्कादायक माहिती
वडिलांनी व्यक्त केली नाराजी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांना गवसणी घालणाऱ्या मनूला खेलरत्न पुरस्कारासाठी दुर्लक्षित करण्यात आल्याच्या चर्चांमध्ये मनु भाकरतच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन पदकं मिळवूनही खेलरत्नसाठी हात पसरावे लागत असतील तर, भारतात ऑलिम्पिक खेळांचे महत्त्व नाही हे अधोरेखित होते. देशासाठी खेळून पदके जिंकून काय उपयोग असा नाराजीचा सूरही मनुच्या वडिलांनी आळवला आहे.
क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
एकीकडे मनुच्या नावावरून सुरू झालेल्या नाराजी नाट्यात क्रीडा मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. क्रीडा मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, खेलरत्न पुरस्कारांसाठी अद्याप अंतिम यादी निश्चित झालेली नसून, याबाबत क्रीडामंत्री मनसुख मांडविया एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहेत. तसेच अंतिम यादीत मनु भाकरच्या नावाचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
खेलरत्न पुरस्कार नेमका काय? कशी होते निवड
भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘खेलरत्न पुरस्कार’ पहिले राजीव गांधी खेलरत्न या नावने दिला जात असे. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघांच्या चमकदार कामगिरीनंतर हा सन्मान महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जाईल अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. खेलरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि भविष्यातील स्पर्धांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा सन्मान दिला जातो. याची सुरुवात 1991 साली झाली.
पुरस्कारासाठी खेळाडूंची नावे कशी पाठवली जातात?
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या बारा सदस्यीय निवड समिती विविध खेळांमधील नावांच्या आधारे विजेते ठरवते. सर्व क्रीडा महासंघ त्यांचे नामांकन मंत्रालयाकडे पाठवतात. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नियमांनुसार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची या पुरस्कारासाठी थेट निवड केली जाते.
डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, जिंकली जागतिक स्पर्धा
याशिवाय नवीन नियमांनुसार खेळाडूंना वेगवेगळ्या आधारे गुण दिले जातात. त्यात ९० टक्के गुण त्यांच्या कामगिरीवर आणि १० टक्के गुण त्यांच्या वर्तनावर (क्रीडा आणि शिस्त) दिले जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्याने गेल्या चार वर्षांत एकदा झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकले असेल, तर त्याला 40 गुण, रौप्यसाठी 30 गुण आणि कांस्यपदकासाठी 20 गुण मिळतात. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णासाठी
३० गुण, रौप्यसाठी २५ आणि कांस्यपदकासाठी २० गुण दिले जातात.
प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला होता?
देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जाणारा खेलरन्त पुरस्कार सर्वात प्रथम बुद्धिबळ किंग विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता.