नवी दिल्ली : भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला (Cricket) अलविदा केला आहे. त्याने स्वत: ट्विट करुन निवृत्तीची माहिती दिलीय.
2018 पासून मुरली विजय भारतीय संघातून बाहेर होता. खेळण्यातील सातत्य आणि वाढत्या वयाचा विचार करुन त्याने हा निर्णय घेतला आहे. 38 वर्षीय मुरली विजय भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. 2008 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
विजयने ट्वीट लिहिले की, “आज मी कृतज्ञता आणि नम्रतेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो. 2002 ते 2018 हा माझा प्रवास असून या खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान होता.”
त्याने पुढे लिहिले की, “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज यांचा आभारी आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ, तुम्हा सर्वांसोबत खेळणे ही एक मोठी गोष्ट होती आणि मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.”
तसंच मुरली विजयने पुढे लिहिले की, “मी हे जाहीर करताना आनंदी आहे की मी क्रिकेट जगतात आणि त्यासंबधित व्यवसायात नवीन संधी शोधत आहे, जिथे मी माझ्या आवडीच्या खेळात आणि नवीन आणि वेगळ्या वातावरणात भाग घेत राहीन. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे आणि मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे.”
विजयच्या नावावर एक विशेष रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळताना त्याने चेतेश्वर पुजारासोबत 370 धावांची भागीदारी केली होती. यावेळी त्याने 361 चेंडूंचा सामना करत 167 धावा केल्या होत्या. त्याने 473 मिनिटे फलंदाजी केली होती.
मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामन्यांच्या 105 डावांमध्ये 38.28 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकली आहेत.
याशिवाय त्याने 17 एकदिवसीय सामन्यांच्या 16 डावांमध्ये 21.18 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे. 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने 18.77 च्या सरासरीने आणि 109.74 च्या स्ट्राइक रेटने एकूण 169 धावा केल्या आहेत.