स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं विवाहसोहळा 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार होता. या लग्नासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. हळदीचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडला. (Sports) स्मृतीच्या संघ सहकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला चार चाँदही लागले. धमाल मस्तीचे व्हिडीओ क्रीडारसिक आणि चाहत्यांमध्ये व्हायरल झाले. लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी मंडळीही लग्नासाठी मांडवात आली. पण अचानक या लग्नसोहळ्यात ट्वीस्ट आला.
काही कळायच्या आत हा लग्नसोहळा थांबवण्यात आला. लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा लग्नसोहळा टाळावा लागला. वडिलांची तब्येत बिघडल्याने स्मृतीने हा विवाह पुढे ढकलल्याची चर्चा रंगली. पण आता प्रियकर पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांनी याबाबत खरं काय ते सांगितलं आहे. अमिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न थांबवण्याचा सर्वात पहिला निर्णय त्यांच्या मुलाने घेतला.
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला; ठरली जगातील पाचवी खेळाडू
माध्यमांशी बोलताना पलाश मुच्छलच्या आईने सांगितलं की, पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या खूपच जवळ होता. जसं कार्य सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि स्मृतीच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. तसंच पलाशने लग्नाचे फेरे आणि दुसऱ्या विधी टाळण्यास सांगितल्या. अमिता मुच्छल यांनी पुढे सांगितलं की, ‘पलाशची स्मृतीच्या वडिलांशी जास्त अटॅचमेंट आहे. स्मृतीपेक्षा हे दोघं एकमेकांच्या जवळ आहेत.
जेव्हा असं झालं तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशने निर्णय घेतला की आता फेरे घ्यायचे नाहीत. जिथपर्यंत स्मृतीचे वडील बरे होत नाही तोपर्यंत फेरे घ्यायचे नाहीत. स्मृती मंधानाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पलाशची तब्येतही बिघडली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. आता पलाशला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे.
तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. असं सर्व घडामोडी घडत असताना स्मृतीने दुसऱ्याच दिवशी लग्नसंबंधी सर्व पोस्ट सोशल मीडियावरून डिलिट केल्या. इतकंच काय स्मृतीच्या संघ सहकाऱ्यांनी पोस्ट डिलिट केल्या. त्यामुळे वेगवेगळ्या वावड्या उठल्या आहेत. पण पलाशच्या आईच्या वक्तव्यानंतर यावर तुर्तास पडदा पडला आहे. आता स्मृती आणि पलाशच्या लग्नाची नवी तारीख कधी समोर येते याची उत्सुकता आहे.
