IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामाकरीत आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. (Indian Premier League 2023) केकेआरने डावखुरा फलंदाज नितीश राणाला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. राणा श्रेयस अय्यरची जागी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. कारण श्रेयस अय्यकरच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, यामुळे तो संपूर्ण हंगामासाठी मुकणार आहे. नितीश राणाने भारतासाठी एक वनडे आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत.
नितीश राणा 2018 पासून केकेआरशी संबंधित आहेत. याआधी केकेआरचा नवा कर्णधार म्हणून शार्दुल ठाकूर, नरेन आणि रसेल यांचीही नावे समोर येत होती. मात्र फ्रँचायझीने भारतीय फलंदाजावर विश्वास व्यक्त करत त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. राणा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
फलंदाज म्हणून राणाचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूपच चांगला राहिला आहे. नितीश राणाने 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याच्या दुसऱ्या सत्रातच राणाने 300 हून अधिक धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, 2018 च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने नितीश राणाला करारबद्ध केले होते. तेव्हापासून राणा फ्रँचायझीसाठी पाच हंगाम खेळला आहे.
राणाच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्याने 91 सामन्यात 28 च्या सरासरीने 2181 धावा केल्या आहेत. राणाने आयपीएलमध्ये 15 अर्धशतकेही झळकावली. मात्र टॉप ऑर्डरमध्ये खेळूनही नितीशला अद्याप आयपीएलमध्ये शतक झळकावता आलेले नाही. 2021 मध्ये नितीश राणालाही श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी वनडे आणि टी- 20 पदार्पण करण्याची संधी मिळाली.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे राणाला संघाची कमान मिळाली. गेल्या वर्षी केकेआरने अय्यरला कर्णधार म्हणून संघाशी जोडले होते. मात्र गेल्या वर्षभरात अय्यर यांना पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत अय्यरच्या पाठदुखीने पुनरावृत्ती केली आणि त्याला मैदानात परतण्यासाठी 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.