लखनऊ : रांची T20 मधील पराभवामुळे टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतील रस्ता कठीण झाला आहे. लखनऊमध्ये दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-20 सामना थोड्यावेळाने खेळला जाणार आहे. यामध्ये न्यूझीलंडपेक्षा टीम इंडियावर दबाव अधिक असेल. कारण एका पराभवामुळे भारताचे 3 मोठे नुकसान होऊ शकते.
एक टी-20 मालिका हातातून जाईल. या वर्षातील भारताचा हा पहिलाच मालिका पराभव असेल. दुसऱ्या टी-20 मधील भारताचे पहिले स्थान धोक्यात येईल आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 बनण्याचे स्वप्न धुळीला मिळेल. अशा स्थितीत लखनऊ मधील सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.
टीम इंडिया सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण, भारत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा फक्त एक रेटिंग पॉइंटने पुढे आहे. भारताचे 267 गुण असून इंग्लंडचे 266 गुण आहेत. भारताने लखनऊ टी-20 जिंकल्यास मालिका 1-1अशी होईल आणि अहमदाबाद येथे होणार तिसरा सामना जिंकल्यास मालिका जिंकेल. पण जर टीम इंडिया आजचा सामना हरली तर मालिका हातातून जाईल आणि टी-20 मधील प्रथम स्थान धोक्यात येईल.
हार्दिक पांड्यासाठीही ते महत्त्वाचे ठरणार आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच T20 पराजित होऊ शकतो. यापूर्वी हार्दिकने आपल्या नेतृत्वाखाली श्रीलंका, न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. पांड्याला रांचीमध्येच कर्णधार म्हणून टी-20 मध्ये पहिला पराभव स्वीकारावा लागला. त्याने आतापर्यंत 9 T20 मध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 7 जिंकले आहेत, एक बरोबरीत आहे. म्हणजेच कर्णधार म्हणून पांड्यासाठीही हा सामना महत्त्वाचा असेल.