Download App

‘प्रधानमंत्री बॅनर’चा महाराष्ट्राला बहुमान

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. २९) महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२२-२३ च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १८ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र, राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २८ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

Tags

follow us