Women’s T20 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षी महिला टी 20 विश्वचषकाच्या (Women’s T20 World Cup) वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 8 संघांनी आधीच जागा निश्चित केली होती. त्यानंतर रविवारी आणखी दोन संघ पात्र ठरले. स्कॉटलंड आणि श्रीलंका हे ते दोन संघ आहेत. स्कॉटलंडच्या संघाने उपांत्य सामन्यात आयर्लंडचा पराभव केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत स्कॉटलँड पहिल्यांदाच पात्र ठरला आहे.
या स्पर्धेसाठी आता दहा संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, बांग्लादेश,न्यूझीलँड, स्कॉटलँड आणि इंग्लँड या संघांचा समावेश आहे. येत्या 3 ऑक्टोबरपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत.
याआधी रविवारी स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्यात उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडने 111 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलंडच्या संघाने दमदार खेळ केला. मेगन मॅककॉलने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कर्णधार कॅथरीन ब्राइसन नाबाद 35 रन केले. आयर्लंडकडून एर्लिन केलीने दोन विकेट घेतल्या.
याआधी प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 110 धावा केल्या. त्यांच्या डावात लीह पॉलने सर्वाधिक 45 धावा केल्या तर केलीने 35 धावा केल्या. बाकी कुणाला काही खास करता आले नाही. या सामन्यात आयर्लंडने एकूण 110 धावा केल्या. ब्राइसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रेचल स्लाटरनेही 3 विकेट्स घेतल्या.
यानंतर श्रीलंकेनेही संयुक्त अरब अमिरात संघाचा पराभव करत टी 20 विश्वचषकातील आपली जागा पक्की केली. या सामन्यात श्रीलंकेने युएईसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या युएईच्या संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागला. युएईकडून कर्णधार ईशा ओझाने सर्वाधिक 66 धावा केल्या. या संघाला 20 ओव्हर्समध्ये फक्त 134 धावाच करता आल्या.
श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अट्टापट्टूने दोन खेळाडूंना बाद केले तर इनोशी प्रियदर्शनी, सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधिनी या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेच्या फलंदाजीत विश्मी गुणरत्ने हीने सर्वाधिक 45 रन केले. अट्टापट्टू 21 आणि हर्षिता मादवीने 24 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला 149 धावांपर्यंत मजल मारता आली.