नवी दिल्ली : भारतीय निवड समितीचे (BCCI) अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारतीय क्रिकेटबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वादाबाबत चेतन शर्मा यांनी मोठं भाष्य केलं आहे.
चेतन शर्मा यांचा गौप्यस्फोट
स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहलीमध्ये अंतर्गत वाद होता. खेळाडू आणि अध्यक्षांदरम्यानचा वाद हा खूप भीषण होत जातो. म्हणजे हा वाद खेळाडू विरुद्ध बीसीसीआय (BCCI) असा होता. आता यात चुकी कोणाची आहे, कोणाची नाही हा नंतरचा मुद्दा, पण सरळ बीसीसीआयवर अटॅक असतो.
हे देखील वाचा
Team India डोपिंगच्या विळख्यात? स्टिंग ऑपरेशनमधून खळबळजनक दावे
यात खेळाडूचं नुकसान असतं. खेळाडूला थोडं महत्व मिळालं की त्याला वाटतं तो खूप मोठा झाला आहे, म्हणजे बोर्डापेक्षाही मोठा झाल्याचं वाटतं. मग त्याला वाटतं आपलं कोणी काहीही करु शकणार नाही. माझ्याशिवाय भारतात क्रिकेट बंद होईल असं त्याला वाटायल लागतं. पण मोठ-मोठे खेळाडू आले नी गेले, क्रिकेट तिकडेच आहे. विराट कोहलीने तेच केलं असं चेतन शर्मांनी म्हटलं आहे.
विराट कोहली आणि सौरभ गांगुलीमध्ये इगोचा वाद आहे. विराट बोलतो मी मोठा आहे, गांगुली बोलता मी मोठा आहे. सौरभ गांगुलीही टीम इंडियाचा कर्णधार होता. आजही तो सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण विराटला वाटतं तो यशस्वी कर्णधार आहे. यावरुनच दोघांमध्ये युद्ध पेटलं. चेतन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार गांगुली आणि विराटमध्ये वादाचा सर्वात मोठा मुद्दा होता तो म्हणजे दोघांचा इगो. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितलं की विराट कोहलीने जाणूनबुजून सौरभ गांगुलींवर पलटवार केला.
2021 मध्ये UAE मध्ये T20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेआधीच विराट कोहलीने टी20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. टीम इंडिया साखळी सामन्यातच गारद झाली. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत पाकिस्तानकडून कधीच हरला नव्हता. पण या वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून तब्बल 10 विकेटने पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत विराटने पाच सामन्यात केवळ 68 धावा केल्या.
यानंतर भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा होता. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड करण्यात आली. विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार होता, पण अचानक एकदिवसीय सामन्यात त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आलं. विराटने केलेल्या दाव्यानुसार एकदिवसीय कर्णधार बदलल्याची माहिती त्याला संघाची घोषणा करण्याच्या केवळ दीड तास आधी देण्यात आली होती. आपल्या मनातील ही खदखद त्याने पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.
चेतन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली यांनी विराटला टी20 संघाचं कर्णधारपद सोडू नकोस असा सल्ला दिला होता. पण विराटने असा कोणताही सल्ला गांगुलीने दिला नसल्याचं स्पष्ट सांगितलं. उलट मी कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी कोणतीही आडकाठी न करता त्याचा स्विकार केला.
आता गांगुली किंवा विराट या दोघांपैकी एकाचा दावा खोटा आहे. पण कोणाचा दावा खोटा आहे. यावर चेतन शर्मा यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. विराट कोहली कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात होता, तिथे त्याने केवळ संघाबद्दल बोलणं अपेक्षित होतं, पण तिथे त्याने आपल्या राजीनाम्याचा विषय काढला, जो गरजेचा नव्हता. जाणूनबुजून त्याने हा विषय तिथे काढला. त्याला असं वाटत होतं की माझं कर्णधारपद बीसीसीआय अध्यक्ष म्हणजे सौरभ गांगुलीमुळे गेलं.
चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला कर्णधारपद न सोडण्याबद्दल सांगितलं होतं. एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ही चर्चा झाली होती. पण कदाचित गांगुलीचं बोलणं विराटने ऐकलं नसेल. कारण त्या बैठकीत नऊ जण होते. मी पण होतो. पण यानंतरही विराटने जाणुनबूजून हा विषय पत्रकार परिषदेत काढला. विराट खोटं बोलत असल्याचा धक्कादायक दावा चेतन शर्मा यांनी केला आहे. विराट का खोटं बोलतोय हे आजपर्यंत कोणाला माहित नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असं चेतन शर्मा यांनी सांगितलं.