केपटाऊन : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग आठवा टी-20 विजय आहे. या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.
या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारीला इंग्लंडशी होणार आहे.
केपटाऊन मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 118 धावा केल्या. संघाकडून स्टेफनी टेलरने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर शेमेन कॅम्पबेलने 30 धावांचे योगदान दिले. भारताकडून दीप्तीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तिला सामनावीराचा मान देखील मिळाला.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने विजयासाठी आवश्यक असलेल्या 119 धावा 19 व्या षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांच्या अर्धशतकी भागीदारीने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. कौरने 33 आणि ऋचा घोषने 44 धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहार्कने दोन विकेट घेतल्या. तर हेली मॅथ्यूज आणि चिनेल हेन्री यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ICC Ranking : महिन्याभरात आयसीसीकडून झाली दुसऱ्यांदा चूक
शेफाली-मंधानाने वेगवान सुरुवात केली
सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. भारतीय संघाने पहिल्या दोन षटकात 28 धावा केल्या, परंतु ही जोडी जास्त काळ टिकू शकली नाही मंधाना केवळ 10 धावां करून बाद झाली तर शेफाली वर्माने 28 धावांचे योगदान दिले.