लिएंडर पेस भाजपमध्ये ; आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी निवडला राजकारणाचा रस्ता ?

Leander Paes -लिएंडर पेस हे पाच वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहे.

Tennis Legend Leander Paes Joins BJP

Tennis Legend Leander Paes Joins BJP

Tennis legend Leander Paes joins BJP: भारतातील खेळाडूंचा राजकारणाशी अंत्यत जवळचा संबंध आहे. खेळानंतर दुसरी इनिंग ते राजकारणाच्या पिचवर खेळतात. हे आज पुन्हा आठविण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांचा भाजप (BJP) प्रवेश. लिएंडर पेस हे पाच वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहे. कोणत्या-कोणत्या खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केला आणि यशस्वी झाले हेच पाहुया…


मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील मोरादाबाद लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. पण 2014 आणि 2023 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख म्हणूनही अझरुद्दीन यांनी काम केले आहे. ते सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार आहे.

नवज्योतसिंग सिद्धू
माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजप, काँग्रेसमध्ये राजकारण केले आहे. आता ते स्वतःचा ‘आवाज-ए-पंजाब’ पक्ष चालवत आहे. ते 2004 आणि 2009 च्या सार्वत्रिक निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. भाजपमधील नेत्यांशी वाद झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले आणि अमृतसर पूर्वमधून विधानसभा निवडणूक जिंकले. परंतु 2022 च्या राज्य निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून ‘आप’च्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत झाले. सध्या ते राजकारणापासून दूर आहेत.


राज्यवर्धन सिंह राठोड

आलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत पहिले रौप्यपदक मिळवून देणारे राजवर्धनसिंह राठोड हे 2013 मध्ये भाजपमध्ये आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जयपूर मतदारसंघातून निवडून आले. 2019 ला ही लोकसभेत आले. ते केंद्रात मंत्री होते. पुन्हा राजस्थानच्या विधानसभेच्या रिंगणात उतरून निवडून आले असून, ते कॅबिनेट मंत्री आहेत.

सायना नेहवाल
लंडन ऑल्मिपिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिच्या बहिणीने 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. परंतु दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाहीत.


गौतम गंभीर

दोनवेळा विश्वचषक विजेते संघाचे फलंदाज आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गंभीर हेही राजकारणात आले होते. 2019 ला ते भाजपमध्ये दाखल झाले आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभेत गेले. पण ते राजकारणात रमले नाही. ते राजकारण सोडून पुन्हा क्रिकेटमध्ये आले आणि प्रशिक्षक झाले.


कीर्ती आझाद

1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे भाग राहिलेले कीर्ती आझाद यांना भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकली. परंतु 2015 मध्ये ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि कीर्ती आझाद यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर ते 2019 ला काँग्रेसमध्ये गेले. परंतु तेथेही टिकले नाहीत. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. ते पश्चिम बंगालमधील बर्दवान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत.


विनेश फोगट आणि बजरंग पुनिया

लैंगिक छळाचा आरोप असलेले भाजप नेते आणि तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन झाले. त्यांच्याविरोधात कुस्टीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आक्रमक आंदोलन केले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. फोगट या हरियाणा विधानसभेच्या सदस्य आहेत. तर पुनिया हे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रमुख आहेत.


विजेंदर सिंग

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग 2019 मध्ये काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आला. पण त्याच वर्षी दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर 2024 मध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला.


बायचुंग भुतिया

भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया 2024 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाला. पण दार्जिलिंगमधून सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा पराभव झाला. नंतर त्याने ‘हमारो सिक्कीम’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण निवडणुकीत त्याला कोणताही प्रभाव पाडता आला नाही.


हरभजन सिंग

माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा आम आदमी पक्षात दाखल झाला आहे. ते आपकडून राज्यसभेवर आहे.


चेतन चौहान

चेतन चौहान यांनी क्रिकेटनंतर राजकारणाची वाट धरली. ते भाजपमध्ये दाखल झाले. ते 1991 आणि 1998 मध्ये अमरोहाचे खासदार होते. 1996, 1999, 2004 मध्ये ते याच मतदारसंघातून पराभूत झाले. त्यानंतर काही काळ ते राजकारणापासून दूर होते. परंतु 2017 मध्ये ते उत्तर प्रदेशमधील नौगवान सादात विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्रीही होते. 2020 मध्ये चौहान यांचे निधन झाले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे भाजपमध्ये सक्रीय आहेत.


यूसूफ पठाण

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण हा तृणमूल काँग्रेसकडून खासदार आहे. युसूफ पठाण हे मुळचे गुजरातमधील बडोदा येथील आहे. 2023 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांना पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. त्यात ते यशस्वी झाले.

खेळातील प्रसिद्धीचा फायदा अनेक खेळाडूंनी घेतला. राजकीय पक्षांनाही खेळाडूंचा उपयोग झाला. त्यात काही जण मंत्रिपदापर्यंत गेले. तर काही जणांना यश मिळू शकले नाही. त्यामुळे ते पुन्हा साइडला गेले आहेत.

Exit mobile version