Download App

भारत-न्यूझीलंड मालिका बुधवारपासून होणार सुरू

मुंबई : श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकून श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. आता या मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची T-20 मालिका खेळणार आहे.

एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक
सर्व प्रथम, एकदिवसीय मालिका सुरू होईल, ज्याचा पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

टी 20 सामन्याचे वेळापत्रक
वनडे मालिकेनंतर टी-20 चा पहिला सामना 27 जानेवारीला रांचीमध्ये, त्यानंतर दुसरा सामना 29 जानेवारीला लखनऊमध्ये होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतने प्रथमच संघात प्रवेश केला आहे. ऋषभ पंतला वगळल्यामुळे या खेळाडूला वनडे संघात संधी मिळाली आहे. तसेच केएल राहुलही त्याच्या लग्नामुळे या मालिकेतून बाहेर होणार आहे. याशिवाय अक्षर पटेल न्यूझीलंडच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकाही खेळणार नाही.

न्यूझीलंड विरुद्धच्या भारतीय T20 संघात हार्दीक पांड्याला पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-20 संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय युवा फलंदाज पृथ्वी शॉला भारतीय संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर यष्टीरक्षक जितेश शर्माचीही टी-20 संघात निवड झाली आहे.

Tags

follow us