Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी (Asian Games 2026) शुक्रवारी तीन सुवर्ण जिंकत सुवर्णमय कामगिरी केलीय. अंकुश पंघालने (Ankush Panghal) पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या मिनसॉन्ग किमचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंकुशच्या विजयामुळे भारताने एका दिवसात बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्णपदकांची हॅट्रिक केलीय.
अंकुशने अंतिम लढतीत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या फेरीत त्याने 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत सर्व पंचांनी त्याच्या बाजूने 5-0 असा निर्णय दिला. तिसऱ्या फेरीतही अंकुशने 4-1 अशी बाजी मारत सामना आपल्या नावावर केला. त्यानंतर अखेर 4-0 अशा एकतर्फी निर्णयाने त्याने सुवर्णपदक जिंकले. अंकुशच्या या विजयापूर्वी भारताच्या लोव्हलिना बोर्गोहेन आणि परवीन हुड्डा यांनीही आपापल्या अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे भारतीय बॉक्सिंगसाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.
लोव्हलिनाचा वाढदिवशी सुवर्णविजय
लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या झियी बाओचा 5-0 असा पराभव केला. आपल्या 29व्या वाढदिवशी लोव्हलिनाने सुवर्णपदक जिंकत हा दिवस अविस्मरणीय बनवला. लोव्हलिनाने यापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. यावेळी तिने रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर केले. तिच्या विजयामुळे भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी असलेली 12 वर्षांची प्रतीक्षा संपलीय. लोव्हलिना ही आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची दुसरी महिला ठरली. यापूर्वी दिग्गज बॉक्सर एम.सी. मेरी कोमने 2014 मध्ये इंचॉन येथे महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते.
परवीन हुड्डाचीही शानदार कामगिरी
महिलांच्या 65 किलो वजनी गटात परवीन हुड्डानेही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या चिनी तैपेईच्या चेन निएन-चिनचा 3-2 असा पराभव केला. अशाप्रकारे लोव्हलिना, परवीन आणि अंकुश या तिन्ही भारतीय बॉक्सरनी अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतासाठी एका दिवसात बॉक्सिंगमधील तीन सुवर्णपदकांची ऐतिहासिक हॅट्रिक पूर्ण केली.
