Virat Kohli broke Sachin’s record : भारतीय क्रिकेटचा किंग विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आणखी एका ऐतिहासिक विक्रमला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरोधात तिरुअनंतपुरम येथे खेळताना विराटने वनडे क्रिकेटमधील 15 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे विराटने अवघ्या 303 व्या इनिंग्समध्ये ही कामगिरी करत आपला आदर्श सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. सचिनने वनडेत 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 377 इनिंग्स घेतल्या होत्या, तर विराटने सचिनपेक्षा तब्बल 74 इनिंग्स आधी हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यापूर्वी विराटच्या खात्यात 14 हजार 941 वनडे धावा होत्या. त्यामुळे 15 हजार धाव पूर्ण करण्यासाठी त्याला 59 धावांची गरज होती. लक्षच पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. रोहित 32 धावा करून बाद झाल्यानंतर विराट मैदानात उतरला आणि सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
विराटने अवघ्या 40 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी 9 धावांची आवश्यकता होती. मात्र विक्रमाच्या उंबरठ्यावर असतानाही विराटने सावध खेळण्याऐवजी आपली आक्रमक शैली कायम ठेवली. सलग दोन चौकार लगावत त्याने 46 चेंडूंत 59 धावा पूर्ण केल्या आणि त्याचबरोबर वनडे क्रिकेटमधील 15 हजार धावांचा ऐतिहासिक टप्पाही सर केला.
पदवीधर निवडणुकीत कराळे मास्तर उतरणार, तिकीट न मिळाल्यास अपक्ष जिंदाबादचा दिला नारा
हा विक्रम पूर्ण होताच विराटने दोन्ही हात उंचावत आपला आदर्श सचिन तेंडुलकरप्रती आदर व्यक्त केला. यावेळी मैदानातील प्रेक्षकांनीही उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात विराटच्या ऐतिहासिक कामगिरीला दाद दिली. आकडेवारी पाहिली तर विराटच्या या कामगिरीचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये आपल्या 377 व्या वनडे इनिंग्समध्ये 15 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने मात्र हा टप्पा 303 व्या इनिंग्समध्येच गाठला. म्हणजेच सचिनपेक्षा तब्बल 74 इनिंग्स कमी खेळून विराट 15 हजारी बनला आहे.
याआधी 13 हजार वनडे धावांचा टप्पा गाठतानाही विराटने सचिनला मागे टाकलं होतं. विराटने 267 इनिंग्समध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर सचिनला त्यासाठी 321 इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या. आता विराट कोहली पुरुषांच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात 15 हजार धावा पूर्ण करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 18 हजार 426 धावांसह सचिन तेंडुलकर अजूनही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. मात्र सर्वात वेगाने 15 हजार वनडे धावा पूर्ण करण्याचा नवा इतिहास आता विराट कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे.
