Virat Kohli Reveals Special Connection with 18 Number IPL 2025 : 18 क्रमांकाची जर्सी घातलेला एक खेळाडू त्याच्या संघासाठी आयपीएल ट्रॉफीची (IPL 2025) थेट 18 वर्षे वाट पाहत होता. अनेक वर्षे कर्णधारपद भूषवले आणि ट्रॉफी मिळविण्यासाठी त्यागही केला, पण यश मिळू शकले नाही. अखेर काल ते स्वप्न पूर्ण झालंय. 18 क्रमांकाची जर्सी घातलेला खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. विराटसाठी (Virat Kohli) 18 हा क्रमांक खूपच खास असल्याचं म्हटलं जातंय. आपण ते सविस्तर जाणून घेऊ या.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. अखेर स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. ही ट्रॉफी विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कारण विराट कोहली (Virat Kohli RCB Win) आयपीएलच्या 18 व्या हंगामात आरसीबीकडून खेळला आहे. त्याने पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीचा जर्सी नंबर देखील 18 आहे. आता हा नंबर त्याच्यासाठी आणखी खास झाला आहे.
विराटने आधीच केला होता मोठा खुलासा
विराट कोहलीने आधीच खुलासा केला होता की, माझ्या वडिलांचे 18 डिसेंबर रोजी निधन झाले. मी 19 वर्षांखालील संघात सामील झालो, तेव्हा त्यांनी मला 18 क्रमांकाची जर्सी दिली. मी 18 ऑगस्ट रोजी भारतासाठी पदार्पण केले. मला माहित नाही, पण 18 क्रमांक माझ्या आयुष्यात खूप खास स्थान ठेवतो.
आयपीएलचा हा 18 वा हंगाम होता. आरसीबीसाठी अंतिम सामन्यात विराट कोहली मोठी धावसंख्या करू शकला नाही, तरी त्याने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात विराटने 43 धावांची खेळी खेळली. त्याने त्याच्या खेळीदरम्यान तीन चौकार मारले.
आयपीएल 2025 चा अंतिम सामना
आयपीएल 2025 चा अंतिम सामना आरसीबीने जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. विराट कोहली व्यतिरिक्त कर्णधार रजत पाटीदारने 26 धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टोनने 25 धावा केल्या. जितेश शर्माने 24 धावांचे योगदान दिले, तर मयंक अग्रवालनेही 24 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने चार षटकांत 40 धावा देत तीन विकेट्स घेतल्या, तर काइल जेमिसनने चार षटकांत 48 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
तर पंजाब किंग्जला 20 षटकांत 7 गडी गमावून फक्त 184 धावा करता आल्या. पंजाबचा सर्वोत्तम फलंदाज शशांक सिंगने 61 धावांची तुफानी खेळी केली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शशांक सिंग व्यतिरिक्त, जोश इंग्लिसने 39 धावा केल्या तर प्रभसिमरन सिंगने 26 धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने चार षटकांत 38 धावा देत दोन विकेट घेतल्या तर कृणाल पंड्यानेही दोन विकेट घेतल्या.