नवी दिल्ली : श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ‘टाईम आऊट’ होणारा पहिला बॅट्समन ठरला आहे. वेळेत स्ट्राईकला येऊन पहिला बॉल फेस न केल्याने त्याच्यावरही ही लाजिरवाणी वेळ ओढावली आहे. यामुळे मॅथ्यूज चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे. सोबतच हा नियम नेमका काय आहे? याविषयी देखील सवाल विचारला जाऊ लागला आहे. (Angelo Mathews becoming the first batter to be timed out in international cricket)
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 38 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. समरविक्रमा झेलबाद झाल्यानंतर मॅथ्यूज क्रीजवर आला. मात्र मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात पोहोचला होता. यानंतर त्याने योग्य हेल्मेट मागवून घेतले. मात्र या सगळ्या गोष्टीला 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाला. (What is the ‘time out’ rule in international cricket that declares Angelo Mathews out)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाने दुखापतीमुळे मैदान सोडल्यानंतर पुढच्या फलंदाजाने तीन मिनिटांच्या आत स्ट्राईकला येऊन पुढील बॉल खेळणे आवश्यक असते. जर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला तर विरोधी टीम टाईम आऊटसाठी अपिल करु शकते. यानंतर त्या खेळाडूला ‘टाईम आऊट’ ठरवले जाते.
https://twitter.com/aankjain/status/1721480014154096809
याच नियमाचा फायदा उचलत बांगलादेश संघाने मॅथ्यूजच्या या गोष्टीकडे अंपायरचे लक्ष वेधले आणि विकेटसाठी अपिल केले. अंपायर्सनेही चर्चा करुन नियमांची आणि मैदानावरील स्थितीची पडताळणी करुन मॅथ्यूजला बाद घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधून श्रीलंका आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. श्रीलंकन संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे तर बांगलादेश संघ नवव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास पात्र होण्यासाठी लढत आहेत. टॉप आठ टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतात.