सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर, तर वैभव सूर्यवंशीचे पदार्पण; भारतीय टी-20 संघात बदलांचे वारे

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी जाहीर होणाऱ्या टी-20 संघात श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Untitled Design 34

Untitled Design 34

Winds of change in the Indian T20 team : भारतीय टी-20 संघात मोठ्या बदलांची चाहूल लागली आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापन नव्या नेतृत्वाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी जाहीर होणाऱ्या टी-20 संघात श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते.

मार्च महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला असला, तरी त्यानंतरच्या काळात त्याच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. 2026 च्या टी-20 विश्वचषकात त्याने नऊ डावांमध्ये 242 धावा केल्या, तर आयपीएल 2026 मध्ये 13 डावांत केवळ 270 धावा करता आल्या. त्यामुळे 35 वर्षीय सूर्यकुमारला यावेळी संघातून पूर्णपणे वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचा संभाव्य उत्तराधिकारी असलेल्या श्रेयस अय्यरने डिसेंबर 2023 नंतर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसला, तरी नेतृत्वगुणांच्या जोरावर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2024 मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले, तर 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. फलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली असून, आयपीएल 2025 मध्ये त्याने 604 धावा तर आयपीएल 2026 मध्ये 498 धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी टी-20 संघाची सूत्रे त्याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; सुजय-संग्राम या जय-वीरूच्या जोडीने केली कमाल

दुसरीकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे ते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे. आयपीएल 2026 मध्ये त्याने 237 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने तब्बल 776 धावा करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय संघात त्याची निवड झाल्यास, सचिन तेंडुलकरनंतर भारतीय पुरुष संघासाठी निवडला जाणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरेल. त्याआधी 9 ते 21 जूनदरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाकडून तो आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

भारताचा आगामी दौरा 26 आणि 28 जून रोजी बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांनी सुरू होईल. त्यानंतर 1 ते 11 जुलैदरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. या दौऱ्यासाठी जाहीर होणाऱ्या संघातून भारतीय टी-20 क्रिकेटच्या नव्या पर्वाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा जाणार का आणि वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version