Download App

‘किस्से वर्ल्डकप’चे वर्ष 1983! सेलिब्रेशनसाठी उधारीची शॅम्पेन अन् उपाशी खेळाडू…

Memories Of 1983 World Cup : येत्या पाच ऑक्टोबरपासून इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने आयसीसी वर्ल्डकप (World Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याची उत्सुकताही आता सगळ्यांनाचं लागली आहे. परंतु 1983 (World Cup 1983 ) मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तो उत्साह, तो आनंद आजही मोठ्या गर्वाने बोलला आणि सांगितला जातो. 1983 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अंतिम सामन्याचे अनेक असे रंजक किस्से आजही सांगितले जातात. त्यातीलच एक किस्सा म्हणजे सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाकडून घेतलेली उधारीची शॅम्पेन आणि सेलिब्रेशनच्या नादात उपाशी राहिलेले खेळाडू होय.

40 वर्षांपूर्वी भारत बनला वर्ल्डकप चॅम्पियन

25 जून 1983 हा दिवस भारताच्या विश्वचषक इतिहासातील अविस्मरणीय दिवस मानला जातो. 40 वर्षांपूर्वी भारत वर्ल्डकप चॅम्पियन झाला होता. 1975 सालचा आणि 1979 सालचा असे दोन्ही वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने 1983 सालचा विश्वचषक जिंकण्याची सर्व तयारी केली होती. 1975 आणि 1979 प्रमाणे भारतीय संघाची कामगिरी खराबच होईल असा विश्वास वेस्ट इंडिजच्या संघाला होता.
परंतु यावेळी घडलं काही तरी वेगळचं. भारत आणि वेस्ट इंडिजच्या फायनल मॅचमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 43 धावांनी मात करत विश्वचषकावर पहिल्यांदा भारताचं नाव कोरलं. भारतीय क्रिकेट संघाच्या या अनपेक्षित कामगिरीमुळे तर क्रिकेट विश्वात जणू खळबळचं उडाली होती.

पराभूत वेस्ट इंडिज संघाकडूनच घेतली शॅम्पेन

1983 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत होईल असा विश्वास वेस्ट इंडिजच्या संघाला होता. त्यासाठी त्यांनी विजयानंतरच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात शॅम्पेनच्या बाटल्या ड्रेसिंग रूममध्ये आणून ठेवल्या होत्या. मात्र, झाले उलटेच. भारताने वेस्ट इंडिज संघाचे सर्व खेळाडू 140 धावांत बाद करत 43 धावांनी पराभव केला. त्यामुळे शॅम्पेनच्या बाटल्या असतानाही पराभावमुळे हा आनंद वेस्ट इंडिजच्या संघाला साजरा करता आला नाही.

विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव वेस्ट इंडिज खेळाडूंसोबत हात मिळवण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यावेळी तेथे भयाण अशी शांतता पसरली होती. यावेळी कपिल देव यांना त्या ठिकाणी शॅम्पेनच्या बाटल्या दिसून आल्या. पराभव झाल्याने ड्रेसिंग रूममधील शॅम्पेनच्या बाटल्यांचा वेस्ट इंडिजच्या संघाला काहीच उपयोग होणार नव्हता. त्यामुळे कपिल देव यांनी तेथील एका व्यक्तीला आपण यातील काही बाटल्या घेऊन जाऊ शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर समोरील व्यक्तीने होकार देताच कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ यांनी काही बाटल्या उचलल्या आणि सेलिब्रेशन करण्यासाठी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमकडे गेले. या दिवशी टीम इंडियाने अख्खी रात्र वर्ल्डकप जिंकण्याचं सेलिब्रेशन केले होते.

सेलिब्रेशनच्या नादात भारतीय संघ राहिला उपाशी

विश्वचषकावर पहिल्यांदाच भारतीय संघाचं नाव कोरलं गेले होते. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू मोठ्या उत्साहात होता. मात्र, याच आनंदाच्या भरात त्यावेळी भारतीय संघातील सर्व खेळाडूंना उपाशी झोपावे लागले होते. कारण लॉड्सवरील सेलिब्रेशन आटपून ज्यावेळी भारतीय संघ हॉटेलममध्ये पोहोचला त्यावेळी खूप उशीर झाला होता. हॉटेलचे किचन नऊच्या सुमारासचं बंद झाले होते आणि जेवणही संपले होते. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतरही भारतीय संघाला त्या दिवशी रात्री उपाशीचं झोपावे लागल्याचा किस्सा सुनील गावसकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला होता.

Tags

follow us