BJP cancels tickets of 42 sitting corporators in Pune : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारी जाहीर करताना यंदा अनेक धाडसी आणि वेगळे प्रयोग केल्याचं चित्र पुणे(Pune) शहरात स्पष्टपणे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये(Elections) विद्यमान नगरसेवक, प्रभावी नेते, आमदार-खासदारांचे नातेवाईक यांना तिकीट देण्याची परंपरा असतानाच, यावेळी भाजपने(BJP) या चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुण्यात भाजपने मोठा निर्णय घेत तब्बल निम्म्याहून अधिक विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली आहे. एकूण 42 विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये केवळ सामान्य नगरसेवकच नव्हे, तर काही प्रभावी आमदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपने ‘घराणेशाहीला ब्रेक’ देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत लोकप्रतिनिधींच्या मुला-नातेवाईकांना उमेदवारी न देण्याची भूमिका घेतली आहे.
या निर्णयामुळे अनेक राजकीय घराण्यांची गणितं कोलमडली असून, काही जणांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांनी पक्षांतर्गत बैठका, सोशल मीडियावरील पोस्ट्स, तसेच समर्थकांच्या माध्यमातून असंतोष व्यक्त केला आहे. तर काही नाराजांनी भाजपला रामराम ठोकत थेट इतर पक्षांमधून उमेदवारी स्वीकारल्याचंही चित्र पुणे शहरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर असला, तरी त्याचसोबत राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.
Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, गाडी अडवत मंत्री सावे, कराडांना थेट शिव्या
दुसरीकडे, भाजपने नव्या आणि तरुण चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचंही दिसून येत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे तरुण, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, तसेच संघटनात्मक बांधणीमध्ये सक्रिय असलेल्यांना उमेदवारी देत भाजपने ‘नवी पिढी’ पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपने खुल्या जागांवरही महिलांना प्राधान्य देत थेट विरोधी पक्षांतील पुरुष उमेदवारांपुढे आव्हान उभं केलं आहे. महिलांना केवळ आरक्षित जागांपुरतं मर्यादित न ठेवता खुल्या जागांवर संधी देण्याचा हा प्रयोग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
भाजपच्या या निर्णयामागे ‘अँटी-इन्कम्बन्सी’चा फटका टाळण्याची रणनीती असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा फीडबॅक पक्षाला मिळाल्यानंतर, नव्या चेहऱ्यांवर विश्वास टाकण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच स्थानिक पातळीवर बदलाची अपेक्षा असलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचाही हा प्रयत्न मानला जातो.
दरम्यान, भाजपचे हे नवे प्रयोग मतदारांच्या कितपत पसंतीस उतरतात, नाराजांचा फटका पक्षाला किती बसतो आणि तरुण व महिला उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात किती प्रभावी ठरतात, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे. पुणे महापालिकेची ही निवडणूक भाजपसाठी केवळ सत्ता टिकवण्याची नव्हे, तर पक्षाच्या नव्या राजकीय प्रयोगांची कसोटी ठरणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.
