Mumbai high court ex police cop Pradeep Sharma Life imprisonment : मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा कणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma) मुंबईतील शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांचे एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणले गेले. त्यांच्या नावाने कुख्यात गुन्हेगार थरथर कापत होते. अनेकदा वेगवेगळ्या वादातही ते अडकले. पण आता एका एन्काउंटरमध्ये माजी पोलिस अधिकारी हा पुरता अडकलाय. मुंबईतील लखन भैया
इन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा व त्याच्या टीममधील बारा पोलिस अधिकारी व एक नागरिक असे तेरा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai highcourt) जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. विशेष म्हणजे फेक एन्काउंटरमध्ये शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. शिक्षा प्रदीप शर्मा हे पोलिस दलात कधी आले. त्यांच्यावर नावावर किती एन्काउंटर आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेले बनावट लखन भैय्या प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया…
loksabha Election : पुण्याच्या जागेबाबत ट्वीस्ट; शरद पवारांनाच उभे राहण्याचा आग्रह
एकेकाळी मुंबईवर अंडरवर्ल्डचे साम्राज्य होते. खंडणी वसुली, उद्योजक, बॉलिवूडकडून प्रोटेक्शन मनी म्हणून पैसे उकळले जात होते. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी थेट एन्काउंटर केले. यात अनेक धडकेबाज पोलिस अधिकाऱ्यांचे नावे घेतली जातात. त्यात एक नाव म्हणजे प्रदीप शर्मा यांचे नाव. धुळे येथील प्रदीप शर्मा हे 1984 मध्ये पीएसआय म्हणून पोलिस दलात दाखल झाले. पहिलीच पोस्टिंग मिळाली ती मुंबईतील माहिम पोलीस ठाण्यात. त्यानंतर मुंबई उपनगरातील पोलिस ठाण्याचे प्रमुख, क्राइम इंटेलिजियन्समध्ये सिनिअर पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले. खतरनाक गँगस्टर विनोद मातकर याचा एन्काउंटर करून प्रदीप शर्मा हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांनी परवेज सिद्दीकी, रफीक डब्बावाला, सादिक, कालियासारख्या गँगस्टरला संपविले होते. प्रदीप शर्मा यांनी 112 एन्काउंटर केल्याची नोंद आहे.
2006 मधील राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या एन्काउंटर प्रकरणात ते निलंबित झाले होते. मॅटच्या आदेशानंतर 2017 मध्ये ते पुन्हा पोलिस सेवेत आले. त्यांना ठाण्याच्या एंटी एक्सटार्सन सेलचे प्रमुखपद देण्यात आले. पुन्हा सेवेत आल्यानंतर देशातील पळालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरला हप्तावसुली प्रकरणात अटक केली होती. परंतु 2019 मध्ये शर्मा यांनी पोलिस दलातून निवृत्ती घेतली होती. धडाकेबाज कामगिरी करणारा अधिकारी अनेक वादातही अडकला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. परंतु ते पराभूत झाले. त्यानंतरही प्रदीप शर्मा अनेकदा अडचणीत आले. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मनसुख हिरेन मर्डर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक झाली होती. या प्रकरणात सध्या ते बाहेर आहेत. परंतु आता लखन भय्या इन्काउंटर प्रकरणात त्यांना जन्मठेप झालीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय.
लखन भैय्या एन्काउंटर प्रकरण आहे तरी काय ?
वसईचा लखन भैय्या हा गँगस्टर होता. तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी मुंबईत काम करायचा. 2006 मध्ये वाशी येथून शर्माच्या टीमकडून लखन भैया व अनिल भेडा यांना उचलून आणले होते. मुंबईतील वर्सोवा येथे लखन भैया याचा एन्काउंटर करण्यात आला. त्याविरोधात त्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. लखन भैया याची हत्या प्रदीप शर्मा यांच्या पाँईट ब्लॅंक रेंजवरून गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे चौकशीत उघडकीस आले. सत्र न्यायालयात प्रदीप शर्मासह तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यावर खटला सुरू झाला. पण या फेक एन्काउंटरमधील मुख्य साक्षीदार अनिल भेडा याचे अपहरण करून हत्या झाली. दोन महिन्याने त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रदीप शर्मा व त्याच्या टीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सत्र न्यायालयात खटला चालला. एन्काउंटरमध्ये मी नव्हते, असे सांगणारा प्रदीप शर्मा हा निर्दोष सुटला. तर इतर बारा अधिकारी व कर्मचारी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याविरोधात लखन भैय्या याच्या भावाने याचिका दाखल केली होती. तर प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर या खटल्यात सुनावणी झाली. प्रदीप शर्मा विरोधात मिळालेले पुरावे व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले. हे फेक एन्काउंटर असल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने सांगत प्रदीप शर्माला व इतर बारा अधिकारी व एक नागरिक या तेरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणी.
न्याय न मिळणे हे लाजिरवाणे
यातील मुख्य साक्षीदाराच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर चारच दिवसात मुख्य साक्षीदार अनिल भेडा याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. दोन महिन्याने जळालेल्या अवस्थेत त्याचे हाडे मिळून आले. डीएनएच्या मदतीने ओळख पटविण्यात आली. परंतु त्याची हत्या करणारा एकही पकडला गेला नाही. त्याला न्याय मिळाला नाही हे लाजीरवाणे असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. तर पोलिस अधिकाऱ्याने कायद्यानुसारच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.