Look Out Notice Against Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. शिल्पा शेट्टी विरोधात एका व्यक्तीने तब्बल 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कु्ंद्रा यांच्याभोवती कारवाईचा फास आवळू लागला आहे. पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात लूकआउट नोटीस जारी (Look Out Notice) केल्याची माहिती आहे.
मुंबईतील एका व्यापाऱ्याने या पती पत्नीविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. यानंतर शाखेने पुढील कार्यवाही करत दोघांविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (LOC) जारी करण्याची तयार केली होती. यातच आता पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केल्याचे समजते. याचा अर्थ असा की आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा यांच्या (Raj Kundra) हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल. तसेच त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नसेल.
मोठ्या बिझनेसला टाळं लावलं, 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात गंभीर आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय
फसवणुकीचं प्रकरण नेमकं काय
दीपक कोठारी नावाच्या एका व्यापाऱ्याने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. कोठारी यांनी दावा केला आहे की त्यांनी हे पैसे Best Deal TV Pvt. Ltd या कंपनीत व्यवसाय वाढीच्या उद्देशाने गुंतवले होते. परंतु, या पैशांचा वापर वैयक्तिक खर्चांसाठी केला गेला असा आरोप त्यांनी केला. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर 2015 मध्ये कोठारी यांनी एका एजंटच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि राज कु्ंद्राच्या कंपनीच्या संपर्कात आले होते. ही कंपनी प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवत होती.
पैसे देण्यासाठी कंपनीची टाळाटाळ
ज्यावेळी कंपनीला 75 कोटी रुपयांची गरज पडली तेव्हा कंपनी टॅक्स वाचवण्यासाठी कर्जाला गुंतवणुकीचे रुप दिले. याच दरम्यान कोठारी यांनी विविध हप्त्यात कंपनीत 60 कोटी 48 लाख रुपयांची गुंतवणूक केली. एप्रिल 2016 मध्ये स्वतः शिल्पा शेट्टीने पैसे परत करण्याची हमी दिली होती. परंतु, कोठारी यांना पैसे मिळाले नाहीत. काही काळानंतर शिल्पा शेट्टीने या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. याची माहिती कोठारी यांनी देण्यात आली नाही.
सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर कोठारी यांनी कंपनीकड पैशांची मागणी केली. मात्र त्यांना वारंवार टाळण्यात आले. तब्बल 9 वर्षे त्यांना पैसे मिळाले नाहीत. या प्रकरणात आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुंतवणूक केलेले पैसे नेमके गेले कुठे? कोणत्या कामांसाठी या पैशांचा वापर झाला? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.