बीड जिल्ह्यात आजपासून 88 ग्रामपंचायतीची (Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. यात केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. जिल्ह्यात 16 ठिकाणी सरपंच तर 72 ठिकाणी सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंचाचे निधन, राजीनामा किंवा अपत्रातेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या एकूण 88 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. आजपासून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार 13 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील. 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचा निकाल घोषित केला जाणार आहे. या ८८ ग्रामपंचायतीपैकी मस्साजोग येथील निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेल्या घटनेला वर्ष पूर्ण होतंय. त्यामुळे पोटनिवडणुकीत मस्साजोग गावाचा ही समावेश आहे.
बीडमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची स्पर्धा ! दोन वर्षांत सव्वाशे अनधिकृत पुतळे उभारले
या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी कोण निवडणूक लढविणार किंवा ही निवडणूक बिनविरोध होणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, मस्साजोग ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केलं आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत. येणाऱ्या दोन-तीन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील. आजी-माजी सदस्य पॅनल प्रमुख गावकऱ्यांची बैठक झाली. यात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा झाली.
18 महिन्यांचा उरलेला कालावधी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध करण्याचा मानस आहे. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते. स्वर्गीय देशमुखांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहे. या निवडणुकीसाठी शक्यतो मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
तसंत, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. पण, मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे. मला कुठला दबाव नाही. मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही. येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक
बीड – 11
परळी – 11
आष्टी – 11
माजलगाव – 9
गेवराई – 8
अंबाजोगाई – 5
धारूर – 7
पाटोदा – 7
शिरूर – 4
आणि वडवणी – 1
16 सरपंच तर 72 सदस्य अशा एकूण 88 जागेसाठी ही निवडणूक होतेय.
