बीडमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची स्पर्धा ! दोन वर्षांत सव्वाशे अनधिकृत पुतळे उभारले
SP Navneet Kanwat- वेगवेगळ्या विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर पुतळा बसविल्याची परवानगी दिली जाते. त्यानंतर कायदेशीर मार्ग वापरून पुतळे बसविले पाहिजे.
बीड-सोलापूरमधील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला होता. हा पुतळा बेकायदेशीरपणे खोलेबा देवस्थानच्या ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात आला आहे. हा पुतळा आता हलविण्यात येणार आहे. राज्यात महापुरुषांचे पुतळे प्रशासनाची परवानगी न घेता उभारण्याचे पेव फुटले आहे. त्यातून राजकारण होत आहे. बीड जिल्ह्यातही महापुरुषांच्या पुतळ्यांवरून राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागील 27 महिन्यांत तब्बल 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती बीडचे एसपी नवनीत कॉवत (SP Navneet Kanwat) यांनी दिली आहे.
पुतळे बसवण्याच्या या वाढत्या प्रवृत्तीमुळे प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांनी आतापर्यंत 109 गुन्हे दाखल केले आहेत, तर सुमारे 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सध्या महापुरुषांच्या पुतळ्यांवरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी पुतळे बसवण्यावरून वाद निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून शिवप्रेमी आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आल्याची घटना नुकतीच घडली होती.
रात्रीतून पुतळा बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. गेवराईतील घटनेनंतर जिल्ह्यात चार ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत एकूण 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आले असून या प्रकरणात पोलिसांनी 109 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय 500 जणांवर प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचा पुतळ्यांना विरोध नसून ते नियमांनुसार व्हावे-नवनीत कॉवत
प्रशासनाचा पुतळ्यांना विरोध नसून ते नियमांनुसार व्हावेत, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुतळे उभारण्यासाठी समिती स्थापन करणे, त्याचे संवर्धन करणे आणि महापुरुषांच्या विचारांचे पालन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. पुतळे बसविण्याची परवानगी देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते. वेगवेगळ्या विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर पुतळा बसविल्याची परवानगी दिली जाते. त्यानंतर कायदेशीर मार्ग वापरून पुतळे बसविले पाहिजे, असे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.