आजारी व्यक्तीला बरं करण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; भोंदू मनोहर भोसलेचा आणखी एक प्रताप

महिलेने नकार दिल्यानंतर नराधम भोंदू बाबाने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिल्याची माहिती समोर आली आहे.

News Photo   2026 07 04T213350.285

भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. (BaBa) भोंदूगिरी आणि फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची अवैध माया जमवणाऱ्या मनोहर भोसले याच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे. आजारी असलेल्या दाजीला बरे वाटावे म्हणून आश्रमात आलेल्या एका असहाय्य महिलेवरच या नराधम भोंदू बाबाने अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस ठाण्यात भोंदू मनोहर भोसलेविरुद्ध महिलेविरोधात अत्याचाराचा आणि लाखो रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पीडित महिलेचे दाजी गंभीर आजारी होते. त्यांच्यावर अनेक उपचार करूनही फरक पडत नसल्याने, कोणीतरी सूचवल्यावरून ही महिला 2024 मध्ये मनोहर भोसले याच्या ‘घोटी’ येथील आश्रमात गेली होती.

दोनदा डीए़डची परीक्षा फेल मग थेट पश्चिम बंगाल गाठले; मनोहर भोसलेची सूरस कथा

तिथे दाजींना बरे करण्याच्या नावाखाली मनोहर भोसले आणि त्याचा मुख्य साथीदार ‘नाथबाबा’ यांनी संगनमत करून विविध मार्गांनी त्या महिलेकडून तब्बल 1 लाख 64 हजार रुपये उकळले. पैशांची फसवणूक केल्यानंतर या भोंदू बाबाची वक्रदृष्टी संबंधित महिलेवर पडली. त्याने अमावस्येच्या रात्री 12 वाजता ‘काहीतरी विधी करायचा आहे’ असे सांगून महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकला. मात्र, पीडित महिलेने या अत्यंत अघोरी आणि चुकीच्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला.

महिलेने नकार दिल्यानंतर नराधम भोंदू बाबाने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत मनोहर भोसलेने तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवून करमाळा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि भोंदू बाबा मनोहर भोसले याच्या गुन्ह्यांची वाढती व्याप्ती लक्षात घेता सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत.

एसपी अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की,  या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 5 उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष तपास समिती म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले याने आजपर्यंत दैवी शक्तीचा खोटा आव आणून हजारो भक्तांची फसवणूक केली असून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काळी माया आणि मालमत्ता जमवली आहे.

सध्या एसआयटी आणि सोलापूर पोलिसांचे पथक भोसलेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व आश्रमांची कसून झाडाझडती घेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत आणि भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमांनुसार पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणात त्याचे आणखी काही साथीदार अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

follow us