महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा? रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत

खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव वाढला.

Untitled Design 64

Untitled Design 64

Rupali Chakankar in trouble due to Ashok Kharat case : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव वाढला. अखेर या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. शुक्रवारी, 20 मार्च रोजी संध्याकाळी त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबाव वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशा सूचना केल्याची माहिती समोर आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनंतर घेण्यात आला. त्यामुळेच चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही, तर आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलांना गुंगीचं औषध देणे, त्यांना संमोहनाच्या प्रभावाखाली ठेवणे आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार करणे, असे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.

Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?

याच दरम्यान, रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये चाकणकर अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्या खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसतात. याशिवाय दोघांचे काही फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका असल्याचंही समोर आलं आहे.

तसेच गेल्या वर्षी एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतर त्या महिलेला मदत करण्याऐवजी चाकणकर यांनी खरातलाच मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व आरोपांमुळे आणि व्हायरल व्हिडिओंमुळे चाकणकर यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक दबाव प्रचंड वाढला होता. अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, आता त्यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version