पंकजा मुंडे आणि राज्य भाजपमधील नेते यांच्यामध्ये मतभेद आणि छुपा वाद असल्याचं अनेकदा त्यांचे वक्तव्य, नाराजी, पंकजांची अनेक व्यासपीठांवरील अनुपस्थिती यावरून दिसून येत. त्यात पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या कारवाईनंतर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तसेच ही कारवाई पंकजा मुंडेंवर राजकीय हेतूने केली जात असलेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेला महाराष्ट्रातील दहा ते अकरा जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच भाजपकडून मुंडेंच्या ताब्यात असलेल्या या कारखान्यावर कारवाई केली जात असल्याची राजकीय चर्चा पाहायला मिळतेय. तसेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या भाजपातील दोन नेत्यांमधील मतभेद कायम चर्चेत राहिले आहेत. त्यामुळेच या साखर कारखान्यावरील कारवाईमध्ये सुद्धा राजकारण होते का? असा प्रश्न आता विचारला जातोय.