Ahilyanagar BJP candidate list : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिह्यामधून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज भाजपच्या (BJP) गोटातून पहिली उमेदवारांची यादी समोर आलीय. उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला.
विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह आणखी कुणाला संधी?
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव विधानसभा मतदारसंघात मोनिका राजळे, राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पाचपुते तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. आता महाविकास आघाडी भाजपविरोधात कोणाला रिंगणात उतरवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगरमधील भाजपचे पाचही उमेदवार राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे.
शिर्डीमधून भाजप नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. पक्षातील महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर कर्जत – जामखेडमधील राम शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. तर शेवगावमधून मोनिका राजळे या विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत, त्या पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते हे पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या आहेत. त्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. श्रीगोंद्यातून त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते हे इच्छूक होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी मात्र प्रतिभा पाचपुते यांना तिकीट दिलंय. तर कर्डिले यांना 2019च्या निवडणुकीतील पराभवाचा वचका काढायचा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभेच्या जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास आता सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागल्याचं समोर आलंय. भाजपनं तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा आपल्या पहिल्या यादीमध्ये समावेश केल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. दरम्यान भाजपने पहिली यादी आज जाहीर करून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केलीय. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये १३ महिलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात दोन महिलांना उमेदवारी देण्यात आलीय.
महायुतीचं जागावाटप फायनल; भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यात एकूण भाजपचे 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीतून, मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून, मंत्री सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूरमधून, श्रीजया अशोक चव्हाण हे भोकरमधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून निवडणूक लढवणार आहेत. कुलाब्यातून राहुल नार्वेकर, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.