Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी (MVA) बाजी मारणार असा दावा अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यातच आज मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत विधानसभा निवडणुकीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आले.
तर दुसरीकडे या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला तसेच सरकार आल्यावर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची गॅरंटी दिली.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण जे करतो ते खुलेआम करतो. काळोखात काही करत नाही. आम्ही दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. जे बोलतो तेच करतो. जे बोलत नाही ते करत नाही. आपण मुलांना कौशल्य विकास देणार. मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहे. रोजगार मिळेपर्यंत काय करायचं हे पंचसूत्रीत आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांची मदत करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रतील निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान बचाव फेक नरेटिव्ह वाटत असेल तर अदानीच्या घशात मुंबई घालण्याचे जे जीआर निघाले ते फेक आहे काय? मुंबई अदानीमय केली जात आहे. आमचं सरकार आल्यावर चुकीच्या निविदा काढल्या, ज्या सवलती अदानीला देऊन मुंबई नासवली जाते ते कंत्राट रद्द करू. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सरकार आल्यावर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार आणि राज्यात कृषी समृद्धी योजना लागू करणार अशी घोषणा केली. कृषी समृद्धी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : 3 लाखांपर्यंत कर्जमाफ, शरद पवारांनी दिली शेतकऱ्यांना गॅरंटी
तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्यात महालक्ष्मी योजना लागू करणार अशी घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार असल्याची ग्वाही देखील लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.