Download App

शरद पवार की अजित पवार, दुसऱ्या सामन्यातही काकाच भारी.. वाचा, एक्झिट पोलचे आकडे

एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राजकीय ताकद यामुळे कमी होऊ शकते. 

Exit Polls 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची दुसरी निवडणूक. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पानिपत झालं होतं. या निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आला होता. शरद पवारांचं नाणं मात्र खणखणीत वाजलं होतं. त्यानंतर राज्याच्या विधानसभेची निवडणुकीचं मतदान बुधवारी झालं. मतदारांनी दिलेला कौल ईव्हीएममध्ये बंद झाला. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज आले. या अंदाजातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याची माहिती घेऊ या.. 

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या होत्या. अजित पवार गटाने एकूण 54 जागांवर उमेदवार दिले होते. आता एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांची राजकीय ताकद कमी होऊ शकते. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काका शरद पवार भारी पडल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल

मागील लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र फक्त एकच जागा जिंकता आली. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे विजयी झाले होते. तर बारामती, शिरुर आणि धाराशिव या तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अतिशय कमी राहिला होता.

याउलट लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरस कामगिरी केली होती. या निवडणुकीत शरद पवार गटाने दहा जागांवर उमेदवार दिले होते. यातील 8 जागा जिंकण्यात यश आलं होतं. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  हाच अंदाज विविध एक्झिट पोल्सने खरा ठरवला आहे. विधानसभा निवडणुकीतही काका शरद पवार पुतण्या अजित पवारांना भारी भरले आहेत.

इलेक्टोरल एजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अजित पवार गटाला साधारण 14 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवारी 46 जागांवर बाजी मारतील अशी शक्यता आहे. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनेही शरद पवारांच्याच बाजून कौल दिला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला 17 ते 26 च्या दरम्यान जागा मिळतील तर दुसरीकडे शरद पवार गटाला 35 ते 43 दरम्यान जागा मिळतील असा या एक्झिट पोलचा मूड आहे.

चाणक्यच्या एक्झिट पोलमध्येही शरद पवार गटाचं पारडं जड राहिलं आहे. या पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात तर अजित पवार गटाला 22 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीनेही शरद पवार गटाला झुकतं माप दिलं आहे. या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच शरद पवार गटाला 25 ते 39 दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता आहे.

दैनिक भास्करने दिलेला अंदाजही धडकी भरवणारा आहे. या अंदाजानुसार अजित पवार गटाला फक्त 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर लोकशाही रुद्रच्या सर्व्हेनुसार अजितदादांचे 18 ते 22  आमदार या निवडणुकीत निवडून येऊ शकतात. या एक्झिट पोलचा विचार केला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जितक्या जागा लढवल्या त्यातील निम्म्या जागा सुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता नाही.

अजित पवार मुख्यमंत्री होणार? जय पवारांनी थेट सांगितलं, बारामतीकर

ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळू शकतात ?

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इलेक्टोरल एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे.

लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

follow us