प्रशांत गोडसे,
(लेट्सअप प्रतिनिधी)
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhasabha Election ) वातावरण तापले आहे. या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची थेट लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्यामुळं पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. नावाचे साधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवारांचा फटका नेमका महायुतीला (Mahayuti) किंवा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा तुमचा भ्रम; ‘शिवसेना राष्ट्रवादी संपवण्याचं काम’ म्हणणाऱ्यांना गोगावलेंनी सुनावलं!
विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे की, नावात काय आहे. मात्र प्रत्यक्षात नावातच सर्व काही असल्याचा अनुभव अनेकांना येतो. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया काल पार पडली. पक्षाकडून अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र त्यांच्या नावाशी मिळते-जुळते नाव असलेल्या अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना नावात काय आहे, याचा चांगलाच अनुभव येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल तर झालेत, मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिवशी या अपक्ष उमेदवारांचे महत्व वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
नामसाधर्म्य असलेले दुसरे उमेदवार कोण?
कुडाळ मालवण मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे वैभव नाईक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात भाजपातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार निलेश राणे यांच्याशी वैभव नाईक यांचा सामना होत आहे. त्यामुळे या अतितटीच्या निवडणुकीत वैभव नाईक नावाचा उमेदवार किती मते घेतो? त्याचा विद्यमान आमदार वैभव नाईकांना किती फटका बसतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात देखील सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार रिंगणात उतरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, त्यामुळे या मतदारसंघात देखील अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुहास कांदे यांचे ‘वांदे’ करण्यासाठी दुसऱ्या सुहास कांदे ना रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा आहे.
खेडकरांचं अख्खं कुटुंबच ‘झोलकर’! लोकसभेला पत्नीशी मनोमिलन, विधानसभेला विभक्त…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदार संघातील शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या संजय कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या आणखी दोन संजय कदम या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दापोली मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश कदम व संजय कदम यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या योगेश कदम व संजय कदम यांनी अर्ज दाखल केल्याने त्याचा कितपत फटका खऱ्या अधिकृत उमेदवारांना बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
नाशिक पूर्व मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या दुसऱ्या गणेश गीते यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधात दुसरे वसंत गीते रिंगणात उतरले आहेत.
लोकसभेलाही नामसाधर्म्य…
लोकसभा 2024 ला दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यानावासारखे नाम साधर्म्य असलेले दुसऱ्या भास्कर भगरे यांनी अर्ज भरला होता. त्यांनी तब्बल एक लाख मते घेतली होती, याची पूर्ण चर्चा राज्यभर झाली. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे अनंत गीते रिंगणात उतरले होते.