Ashutosh Kale : 2019 ला मतदार संघातील जनतेला जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. हीच विकास कामे घेवून 2024 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. मतदार संघातील जनतेने पाच वर्षात झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून माझ्या कामावर विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा सेवेची संधी देवून मतांचा अक्षरश: वर्षाव करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. माझा विजय हा विकासाचा आहे आणि मतदार संघातील सुजान मतदारांच्या विश्वासाचा आहे अशी प्रतिक्रिया कोपरगाव विधानसभा संघाचे विजयी उमेदवार आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते.परंतु महायुतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) उमेदवार आ.आशुतोष काळे व महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) उमेदवार संदीप वर्पे यांच्यामध्ये सरळ लढत झाली.यामध्ये विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी संदीप वर्पे यांचा-तब्बल 1 लाख 24 हजार 624 मतांनी पराभव करून न भूतो न भविष्यती असा महाविजय मिळविला. कोपरगाव शहरातील सेवा निकेतन स्कूलच्या कॅम्पसमधील स्ट्रॉंग रूम इव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते.
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होवून दुपारी आ.आशुतोष काळे यांच्या विजयाची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सायली सोळंके यांनी घोषणा करून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. तत्पूर्वी पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले आ.आशुतोष काळे शेवटपर्यंत आघाडीवरच राहिले आणि त्यांचे मताधिक्य वाढत जावून त्यांनी 1 लाख 61 हजार 624 मते मिळवत एकहाती ऐतिहासिक विजय मिळविला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेससह महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करीत फटाक्यांची आतषबाजी करून आ.आशुतोष काळे यांना खांद्यावर घेत एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला व कोपरगाव शहरातून आ.आशुतोष काळे यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आ.आशुतोष काळे यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देतांना पुढे सांगितले की, 2024 च्या निवडणुकीला सामोरे जातांना केवळ विकास आणि विकास याच मुद्यावर निवडणूक लढलो. ज्या ज्यावेळी निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून जनतेसमोर गेलो त्या त्यावेळी माझे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून केलेली विकास कामे व भविष्यातील विकासाच्या संकल्पना कोपरगाव मतदार संघातील जनतेसमोर मांडल्या.पाच वर्षात झालेला विकास पाहता पुढील विकासाच्या संकल्पना माझ्याकडूनच पूर्ण होवू शकतात याची सुजान मतदारांना पक्की खात्री पटल्यामुळे मतदारांनी मला भरभरून मतदान देवून निवडून दिले.
कोल्हे परिवार व त्यांचे कार्यकर्ते, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,अॅड.रविकाका बोरावके यांच्याबरोबरच मतदार संघातील जनतेचा माझ्या विजयात मोठा वाटा असून माझ्या विजयासाठी प्रचार कार्यात स्वत:ला वाहून घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट),भाजपा,शिवसेना (शिंदे गट) आदींसह सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते व ज्ञात-अज्ञात हितचिंतक व मतदार संघातील जनता माझ्या विजयाची शिल्पकार आहे.
कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण घेवून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो होतो मागील पाच वर्षे मतदार संघातील जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. या पाच वर्षात अनेक प्रलंबित कामे व विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले त्यामुळे मी जनतेच्या विश्वासास पात्र ठरलो आणि जनतेने मला पुन्हा संधी दिली ती पण ऐतिहासिक मताधिक्य देवून त्यामुळे निश्चितपणे माझी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे 2019 ला दिलेली आश्वासने पाच वर्षात पूर्ण करून दाखविली त्याप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी दुप्पट वेगाने प्रयत्न करून कोपरगाव जिल्ह्यात नंबर एक करण्यासाठी प्रयत्न करणार.-आ.आशुतोष काळे
मोठी बातमी! मालेगांव मध्य AIMIM चे मुफ्ती इस्माइल फक्त 75 मतांनी विजयी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याच्या आवाहनाला मतदारांनी चांगलेच मनावर घेतल्याचे या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे पहिल्या फेरीपासून आ.आशुतोष काळे यांनी घेतलेले मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच राहिले. शहर असो वा ग्रामीण भाग सर्वच ठिकाणी आ.आशुतोष काळे यांना मताधिक्य मिळाले. यावरून आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचला आणि तो विकास जनतेला भावला देखील असल्याचे आ.आशुतोष काळेंना मतदारांनी दिलेल्या जवळपास सव्वा लाख मताधिक्यातून अधोरेखित होत आहे.