MIFF: चित्रपट महोत्सव नवोदित कलागुणांना वाव देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

MIFF-चित्रपट महोत्सव हे कलात्मक शोध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत.

Miff

Miff

19th Mumbai International Film Festival (MIFF): आज 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (MIFF) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या “अनेक रूपे, एक दृष्टी: चित्रपट महोत्सवांमध्ये विविधतेचा उत्सव” या गोलमेज चर्चेदरम्यान वक्त्यांनी असे मत व्यक्त केले की, चित्रपट महोत्सव विविध अभिव्यक्तींचा उत्सव साजरा करण्यात, नवोदित कलागुणांना वाव देण्यात, सिनेमॅटिक वारसा जतन करण्यात आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

चित्रपटकर्ते, समीक्षक, महोत्सव संचालक आणि चित्रपटसृष्टीतल्या व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या चर्चेत, तांत्रिक नावीन्य, प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या बदलत्या सवयी आणि अस्सल चित्रपटकथनाची वाढती मागणी असलेल्या या युगात चित्रपट महोत्सव कशा प्रकारे विकसित होत आहेत, यावर विचारमंथन करण्यात आले.

या सत्राचे सूत्रसंचालन करताना, पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शीना चौहान यांनी संस्कृती आणि अनुभवांच्या पलीकडे जाऊन चित्रपट माध्यमाच्या लोकांना जोडणाऱ्या गोष्टी सांगण्याच्या ताकदीवर भर दिला. चर्चेच्या सुरुवातीला, चित्रपट महोत्सव प्रेक्षकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जग पाहण्याची आणि समज आणि सहानुभूती वाढवू शकणाऱ्या कथांशी जोडण्याची संधी देतो, असे त्यांनी सांगितले. संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारे चित्रपट अनेकदा स्थानिक अनुभवांतून वैश्विक सत्य मांडतात, असेही त्यांनी नमूद केले.

चित्रपट महोत्सवाच्या वातावरणात चित्रपट पाहण्याच्या अनोख्या अनुभवावर बोलताना, बेंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे संस्थापक आणि कलात्मक संचालक आनंद वरदराज म्हणाले की, सिनेमा हा मुळातच एक सामूहिक अनुभव आहे. अंधाऱ्या चित्रपटगृहात इतरांसोबत चित्रपट पाहिल्याने एक सामायिक भावनिक प्रवास घडतो, त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. एखाद्या प्रभावी दृश्याला प्रेक्षकांचा मिळणारा सामूहिक प्रतिसाद हा एक कलाप्रकार म्हणून चित्रपट माध्यमाचे सत्वच प्रतिबिंबित करतो, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जागतिक चित्रपटसृष्टीतल्या बदलत्या प्रवाहांवरही प्रकाश टाकला आणि मुख्य प्रवाहाबाहेरच्या भाषांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधले. चित्रपट निर्माते आणि लेखक वाढत्या संख्येने आपल्या मातृभाषेत चित्रपटनिर्मिती करायला पसंती देत आहेत, त्यामुळे अधिक समृद्ध आणि अस्सल कथा समोर येत आहेत, असे ते म्हणाले. केवळ महानगरांऐवजी लहान शहरे आणि दुर्गम भागातून आता अनेक प्रभावी चित्रपट पुढे येत आहेत, असे त्यांनी नमूद केले. त्याच वेळी, चित्रपटकर्ते आपल्या कथा सांगण्यासाठी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या सर्जनशील साधनांचा वापर करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लघुपटांच्या वाढत्या लोकप्रियतेवर चर्चा करताना, आजचे प्रेक्षक समकालीन जीवनशैलीला साजेश्या आणि तरीही अर्थपूर्ण कथा सांगणाऱ्या आशयाच्या शोधात असतात, असे ते म्हणाले. आजच्या काळात मोकळा वेळ मिळणे दुरापास्त झालेले असताना, दर्जेदार लघुपटांची ओळख करून देण्याचे आणि ते प्रदर्शित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चित्रपट महोत्सव करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महोत्सवांमुळे दिग्गज चित्रपट निर्मात्यांच्या कमी परिचित असलेल्या कलाकृतींची प्रेक्षकांना ओळख होते. ‘बीआयएसएफएफमध्ये’ मध्ये ऋत्विक घटक यांचे लघुपट प्रदर्शित करण्यात आले. आणि त्यानंतरच प्रेक्षकांना समजले की, या महान दिग्दर्शकाने उत्कृष्ट लघुपटही बनवले होते.

18 जून 2026 रोजी 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ 2026) ‘अनेक रूपे, एक दृष्टीकोन: चित्रपट महोत्सवांमधील विविधतेचा उत्सव’, या विषयावरील गोलमेज सत्रात, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, चित्रपट समीक्षक आणि लेखक प्रेमेंद्र मुजुमदार, चित्रपट निर्माते नीलोत्पल मजुमदार, आनंद वरदराज, दीपक कुमार बेसरा, सावित्री हरी, पॅट्रिशिया सांचेझ मोरा आणि मॉडरेटर (संवादक) अभिनेत्री शीना चौहान सहभागी झाले होते.

चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात चित्रपट महोत्सवांची भूमिका अधोरेखित करताना, चित्रपट समीक्षक आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रेमेंद्र मुजुमदार यांनी, चित्रपट हा एक सामूहिक कला प्रकार आहे आणि चित्रपट पाहणे हा एक सामुदायिक उपक्रम आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट महोत्सव हे भारतातील दीर्घकालीन ‘फिल्म सोसायटी’ चळवळीचाच एक स्वाभाविक विस्तार आहे, या चळवळीने देशभरात अर्थपूर्ण चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल क्रांतीने जगभरातील चित्रपट महोत्सवांच्या जलद वाढीमध्ये योगदान दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. या विस्तारामुळे चित्रपट निर्मात्यांसाठी अधिक संधी निर्माण झाल्या आहेत, त्याचबरोबर गुणवत्ता आणि नियमनाशी संबंधित आव्हानेही निर्माण झाली आहेत. कलात्मक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक संवादाला प्रोत्साहन देण्याबरोबरच, चित्रपट महोत्सव चळवळीला मूलतः प्रेरणा देणारी मूल्ये जतन करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. चित्रपट महोत्सव पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना आकर्षित करत असतात, याकडेही प्रेमेंद्र मुजुमदार यांनी लक्ष वेधले.

महोत्सवातील प्रेक्षकांमध्ये अनेकदा चित्रपट निर्माते, समीक्षक आणि चित्रपटप्रेमींचा समावेश असतो, त्यामुळे चित्रपटांशी अधिक चांगले जोडले जायला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण होते. व्यावसायिक प्रदर्शनात ते नसते. ते पुढे म्हणाले की, अनेक नामांकित चित्रपट निर्मात्यांनी महोत्सवाच्या माध्यमातूनच ओळख मिळवली.

ॲनिमेशन क्षेत्रातील चित्रपट निर्मात्यांसमोरील संधी आणि आव्हानांवर बोलताना तेलंगणा व्हीएफएक्स, ॲनिमेशन अँड गेमिंग असोसिएशनच्या (टीव्हीएजीए) सल्लागार सावित्री हरी यांनी नमूद केले की, ॲनिमेशनकडे आजही प्रामुख्याने मुलांच्या मनोरंजनाचे माध्यम म्हणूनच पाहिले जाते. ॲनिमेशनमध्ये कलात्मक आणि कथाकथनाची क्षमता असूनही, या दृष्टिकोनामुळे वित्तपुरवठा आणि वितरणाच्या बाबतीत अडथळे निर्माण होतात. भारतीय ॲनिमेशनपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, तथापि, भाषिक प्राधान्ये आणि वितरणाशी संबंधित पद्धती अनेक प्रकल्पांची जागतिक पोहोच मर्यादित करतात, असे त्यांनी नमूद केले. सावित्री हरी यांनी चित्रपट निर्मात्यांना बौद्धिक संपदाविषयक धोरणे विकसित करून आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा समजून घेऊन, केवळ सर्जनशीलच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही सज्ज राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. चित्रपट महोत्सव निर्मात्यांना मार्गदर्शक, या उद्योगातील व्यावसायिक आणि जागतिक प्रेक्षकांशी जोडले जायला सहाय्य करू शकतात, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी भावी पिढ्यांसाठी चित्रपट जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, चित्रपट जतनामुळे चित्रपटसृष्टीचा इतिहास आगामी पिढ्या आणि नवीन प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहतो. यामुळेच जगभरातील अनेक प्रमुख चित्रपट महोत्सवांमध्ये आता पुनर्संचयित ‘क्लासिक्स’ (अभिजात चित्रपट) साठी समर्पित विभाग का असतात, हे स्पष्ट होते. त्यांनी चित्रपट निर्मिती आणि चित्रपट महोत्सवांवरील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबद्दलही भाष्य केले.

डिजिटल व्यासपीठामुळे विविध पार्श्वभूमी लाभलेल्या चित्रपटकर्मींना जगभरातील महोत्सवांमध्ये आपले चित्रपट पाठवणे अधिक सुलभ झाले आहे. त्याच वेळी, ॲनिमेशन, मोशन ग्राफिक्स आणि कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रांतील प्रगतीमुळे सर्जनशीलतेच्या कक्षा अधिक रुंदावत आहेत. असे त्यांनी सांगितले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ ) कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत चित्रपटांच्या विशेष विभागाचा संदर्भही त्यांनी मांडला. अंतिमतः प्रेक्षक चित्रपट बनवण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा त्यातील भावनांच्या अस्सलतेलाच प्रतिसाद देतात असे त्यांनी सांगितले.

आदिवासी चित्रपट विकास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि बारीपाडा राष्ट्रीय स्वदेशी लघुपट महोत्सवाचे प्रमुख, तसेच पुरस्कार विजेते चित्रपटकर्मी दीपक कुमार बेश्रा यांनीही आपली मते मांडली. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अस्सलता हाच एकमेव आणि मुख्य मंत्र असल्याचे ते म्हणाले. चित्रपट महोत्सव हे मूळ तसेच आदिवासी समुदायांना त्यांच्या कथा अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाची संधी उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रेक्षक बहुतांश वेळा ज्या कथांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे, संस्कृतीचे आणि अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले असते अशा कथांशी अधिक घट्टपणे जोडले जात असल्याचे त्यांनी नमूद केले की, स्थानिक परंपरा आणि भाषांशी नाळ जोडलेल्या चित्रपटांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद, अस्सलता ही भौगोलिक सीमा ओलांडून जागतिक प्रेक्षकांना देखील आकर्षित करू शकते याचीच साक्ष देतो ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

आशियातील पहिली माहितीपट इनक्युबेटर संस्था असलेल्या डॉकएज कोलकाता या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलोत्पल मजुमदार यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. माहितीपट निर्मितीच्या बदलत्या स्वरूपाचे पैलू त्यांनी उलगडले. गेल्या दशकभरात भारतीय माहितीपटांमध्ये लक्षणीय बदल घडून आले असून, चित्रपटकर्मी आता अधिक व्यापक विषय आणि कथात्मक मांडणी शैली चाचपडून पाहात असल्याचे त्यांनी सांगितले. माहितीपट हे विविध मुद्दे, भावना आणि प्रत्यक्ष जगलेल्या वास्तवाची वीण गुंफून ऐतिहासिक जाणिवा निर्माण करण्यात मदतीच्या ठरतात असे ते म्हणाले. अनेक माहितीपट तयार करणारे अजूनही मर्यादित संसाधनांसह काम करत आहेत, मात्र या प्रकाराप्रति त्यांची वचनबद्धता आणि या प्रकाराबद्दलची त्यांची निस्सीम आवड यामुळे प्रभाव सोडणाऱ्या माहितीपटांचा एक मोठा संग्रह तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. उदयोन्मुख माहिती दिग्दर्शकांना स्वतःमधील क्षमता ओळखता यावी, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि संस्थात्मक पाठबळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

लॉल्टरनेतिव्हा प्रो (L’Alternativa PRO) आणि एक्सट्रीमलॅब फेस्टच्या (EXTREMLAB Fest) संचालिका पॅट्रिशिया सँचेझ मोरा यांनी आपल्या संवादातून माहितीपटांबाबतचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडला. चित्रपट महोत्सव हे प्रयोगशील आणि बिगर व्यावसायिक सिनेमासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे त्या म्हणाल्या. असे महोत्सव चित्रपटकर्मीना जगाच्या विविध भागांमधील सर्जनशील पद्धती समजून घेण्यासाठी मदतीचे ठरत असतात, तसेच अशा महोत्सवांमुळे आंतर सांस्कृतिक संवाद आणि सहकार्यालाही मोठी चालना मिळते असे त्यांनी सांगितले.

चित्रपट महोत्सव हे कलात्मक शोध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत, या मुद्यावर झालेल्या सहमतीने या चर्चेचा समारोप झाला. चित्रपट महोत्सवांमुळे विविधांगी अभिव्यक्तिंना पाठबळ मिळते, नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळते तसेच चित्रपटकर्मी आणि प्रेक्षकांमध्ये अर्थपूर्ण संवादाच्या संधीही निर्माण होत असतात. या माध्यमातून असे चित्रपट महोत्सव स्थानिक कथांचे वेगळेपण जपत जागतिक चित्रपट विश्वाची भाषा अधिक बळकट करण्याचे काम सातत्याने करत असतात. या चर्चेच्या अंतिम टप्प्यात, सर्व वक्त्यांनी चित्रपट बनवण्याच्या मूळ उद्देशाबद्दलचे आपले विचार मांडले. चित्रपटकर्मींना आधी आपल्या कथेवर स्वतःचा पूर्ण विश्वास असायला हवा आणि ती कथा मांडण्यासाठी चित्रपट हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे का, याची स्पष्टता असायला हवी, या मुद्यावर सहमतीचा स्वर या चर्चेतून उमटला. प्रत्येक चित्रपट हा केवळ अस्सलता आणि विश्वासाच्या बळावरच प्रेरित असायला हवा, असे ठोस मतही सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version