देशावर प्रेम असेल तर दुबईत का राहता? विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना राज ठाकरेंचा प्रश्न
रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि देशातील आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली.
Raj Thackeray’s question to Vivek Oberoi and R. Madhavan : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि देशातील आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी विशेषतः अभिनेते विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास होत असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नव्या पिढीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांचा उल्लेख करत त्यांनी देशातून मोठ्या प्रमाणात उद्योगपती आणि गुंतवणूकदार परदेशात स्थलांतरित होत असल्याचा दावा केला. याच मुद्द्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, हजारो उद्योगपती आपला बोजा-बिस्तरा बांधून परदेशात निघून गेले आहेत. देशात सर्व काही सुरळीत आणि विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगितले जाते. पण मग प्रत्यक्षात अनेक मोठी नावं देशाबाहेर का स्थायिक होत आहेत, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.
यानंतर त्यांनी अभिनेते विवेक ओबेरॉय यांचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारे विवेक ओबेरॉय आज दुबईत राहतात. ते दुबईचे नागरिक असल्याचे सांगितले जाते. देशात सर्व काही उत्तम सुरू आहे, असा प्रचार करणाऱ्या व्यक्ती स्वतः भारताबाहेर का राहतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्वराज्याच्या मंत्रापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत; टिळक आणि डोबाल यांच्या कार्याचा अमित शाह यांनी केला गौरव
राज ठाकरे यांनी अभिनेता आर. माधवन यांचा देखील उल्लेख करत म्हटले, मोदी सरकारच्या कामाचे कौतुक करणारे, देशात विकास होत असल्याचे सांगणारे आर. माधवन कुठे राहतात, हे देखील लोकांनी विचारले पाहिजे. ते देखील दुबईमध्ये स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. जर देशात इतकी प्रगती होत असेल, तर या लोकांनी भारतातच राहणे अपेक्षित नाही का?
राज ठाकरे पुढे म्हणाले, या कलाकारांना देशावर प्रेम आहे, पंतप्रधानांवर प्रेम आहे आणि देश योग्य दिशेने चालला आहे, असा त्यांचा विश्वास असेल, तर ते परदेशात जाऊन का राहत आहेत? इथे येऊन चित्रपट करायचे, कमाई करायची आणि पुन्हा दुबई परत जायचे, हे नेमकं कोणत्या विकासाचं चित्र आहे? मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्तींवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सरकारी पाठबळ असलेल्या चित्रपटांमध्ये काम करायचं, देशातील प्रगतीची स्तुती करायची आणि नंतर कुटुंबासह परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं, हा विरोधाभास लोकांच्या लक्षत येत आहे.
सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची भावनिक खंत; आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही, एकाला घरी बसावं लागलं
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. मात्र, त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांचा संदर्भ देत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलेल्या या भाषणामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळात मोठा पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.