अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मुंबईत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावून धीर कुटुंबाला आधार दिला. मात्र, याच कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जॅकी श्रॉफ यांनी शोकसभेत उपस्थित पापाराझींना सुनावलेले शब्द सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कार्यक्रमादरम्यान काही कॅमेरामन अगदी पुढे जाऊन फोटो घेत होते. त्यावर जॅकी श्रॉफ यांनी संयम राखत त्यांना थेट विचारलं, ‘तू शहाणा आहेस ना? तुझ्या घरी असं काही घडलं तर? त्यांच्या या प्रतिक्रिया व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. अनेक नेटिझन्सनी जॅकींच्या संवेदनशील वर्तनाचं कौतुक केलं असून, अशा प्रसंगात मर्यादा पाळण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
पंकज धीर यांच्या श्रद्धांजली सभेसाठी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. त्यात रोहित शेट्टी, शरद सक्सेना, सुरेश ओबेरॉय, ईशा देओल, जॉनी लिव्हर, मुकेश खन्ना, रजत बेदी, तन्वी आझमी, आदित्य पंचोली, पुनीत इस्सर, मोहित रैना आणि इतर दिग्गजांचा समावेश होता. सर्वांनी धीर कुटुंबियांना सांत्वन दिलं आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.
पंकज धीर यांनी बी.आर. चोप्रा यांच्या प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 36 वर्षांनंतरही त्यांचा हा अभिनय चाहत्यांच्या स्मरणात कायम आहे. त्यांनी ‘चंद्रकांता’, ‘बडो बहू’, ‘ससुराल सिमर का’ अशा मालिकांबरोबरच ‘सनम बेवफा’, ‘सोल्जर’, ‘अंदाज’, ‘बादशाह’, ‘जमीन’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता धीर, मुलगा निकितिन धीर, सून कृतिका सेंगर आणि नात देविका असा परिवार आहे. निकितिन आणि कृतिका हे दोघेही अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे आहेत.