दु:खद बातमी! महाभारत मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन
अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. पंकज यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

महाभारत या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. (Mahabharat) ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर आज (15 सप्टेंबर, बुधवार) त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज यांनी आधी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना कॅन्सरचं निदान झालं. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘महाभारता’त अर्जुनाची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी दु:ख व्यक्त केलं. हे खरंय की ते आता हयात नाहीत. वैयक्तिकदृष्ट्या मी माझ्या सर्वांच चांगल्या मित्राला गमावलंय. व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की त्यांचं निधन झालं आहे, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन
पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु, बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतल्या कर्णाच्या भूमिकेनं त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. शिवाय ‘चंद्रकांता’मधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’ आणि ‘बादशाह’सारख्या चित्रपटांमध्येही ते झळकले.
पंकज यांच्या निधनावर CINTAA नेही शोक व्यक्त केला आहे. पंकज हे CINTAAचे माजी जनरल सेक्रेटरी होते. पंकज यांच्या पश्चात पत्नी अनीता धीर आणि मुलगा निकितन धीर असा परिवार आहे. पंकज यांचा मुलगा निकितनसुद्धा कलाविश्वात कार्यरत आहे. त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये थंगबलीची भूमिका साकारली होती. निकितनेही त्याच्या वडिलांप्रमाणेच पौराणिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. त्याची पत्नी म्हणजेच पंकज यांची सून कृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे.