Actor Vivek Sangle : इंस्टाग्राम अकाउंट बंद होऊन तब्बल ६५ दिवस उलटले, तरीही अपीलवर अद्याप निर्णय झालेला नाही. मराठी दूरचित्रवाणी अभिनेता विवेक सांगळे यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी इंस्टाग्रामकडे अपील दाखल केले होते. स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे विवेक यांना यापूर्वी ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेमुळे मोठी ओळख मिळाली होती. त्यांचे व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाल्यानंतर त्यांनी प्लॅटफॉर्मने सांगितलेली नियमित अपील प्रक्रिया पूर्ण केल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील अकाउंट अपील प्रक्रिया प्रत्यक्षात कशी कार्य करते आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागतो, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मोठ्या एजन्सी किंवा व्यवस्थापन टीम नसलेल्या प्रादेशिक कलाकारांसाठी अशा परिस्थितीत पर्यायी मार्ग मर्यादित असतात, असे काही क्रिएटर्सचे मत आहे.
विवेक यांच्या मते, त्यांच्या अकाउंटवरील ज्या कंटेंटबाबत आक्षेप नोंदवला गेला होता त्याबाबत संबंधित ब्रॉडकास्टरने नंतर लेखी स्पष्ट केले की ते ऑटोमेटेड मॅचेस होते आणि कोणतीही मॅन्युअल कॉपीराइट तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. हे स्पष्टीकरण त्यांनी इंस्टाग्रामच्या सपोर्ट सिस्टीमला पाठवून नव्या मॅन्युअल रिव्ह्यूची विनंती केली आहे.
नव्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अकाउंट बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामने सांगितलेली सर्व नियमित प्रक्रिया पूर्ण केल्याचे विवेक यांनी नमूद केले. मेटाच्या मुंबईतील टीमला तसेच अमेरिकेतील सपोर्ट चॅनेललाही ईमेल पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अकाउंट बंद होण्यापूर्वी विवेक यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.४२ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या अनेक रील्सना लाखो आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते. त्यापैकी एका व्हिडिओला ३२ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
आजच्या काळात कलाकारांसाठी इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवादाचे माध्यम नसून प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसेच व्यावसायिक संधींवरही परिणाम होऊ शकतो, असे इंडस्ट्रीतील काही निरीक्षकांचे मत आहे.
या घटनेमुळे मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सना एजन्सी किंवा व्यवस्थापन टीममुळे मिळणारी मदत आणि प्रादेशिक कलाकारांना उपलब्ध असलेली साधने याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
काही क्रिएटर्सचे म्हणणे आहे की, पूर्वी मेटाच्या इकोसिस्टममध्ये क्रिएटर्स आणि एजन्सीसाठी थेट पार्टनर सपोर्ट मार्ग अधिक स्पष्ट होते, मात्र आता अनेक प्रादेशिक कलाकारांना ऑटोमेटेड सपोर्ट सिस्टीमवरच अवलंबून राहावे लागते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अपील प्रक्रियेचा निर्णय साधारणपणे किती कालावधीत दिला जातो याबाबत अधिकृत स्पष्टता नसल्याने अशा प्रकरणांमध्ये क्रिएटर्सना प्रतीक्षा करावी लागते, असेही काही क्रिएटर्सचे मत आहे. दरम्यान, विवेक यांनी या संपूर्ण प्रकरणात प्लॅटफॉर्मच्या प्रक्रियेचा आदर असल्याचे स्पष्ट केले आहे. ते वाद न वाढवता नियमित प्रक्रियेने निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तब्बल तेरा वर्षानी ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतने केलं ‘या’ मराठी चित्रपटासाठी खास गाणं !
इंस्टाग्रामकडे या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया मागवण्यात आली असली तरी लेखनापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी विवेक यांनी नवे इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले असून चाहत्यांना ते फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. जुने अकाउंट अद्याप बंद असले तरी चाहत्यांशी संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न ते नव्या अकाउंटवरून करत आहेत.
नवे इंस्टाग्राम अकाउंट:
