रक्षाबंधनानिमित्त एका दागिन्यांच्या (Raksha Bandhan) ब्रँडसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्री क्रिती सेनन चर्चेत आली आहे. जाहिरातीतील तिच्या पोशाखावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनंही सोशल मीडियावरून या जाहिरातीवर टीका केली. मात्र, या टीकेला आता क्रितीनं थेट उत्तर देत रक्षाबंधनाचा खरा अर्थ कपड्यांपेक्षा नात्यांमधील भावना आणि परंपरेशी जोडलेला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
क्रिती सेनन एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत तिनं ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाइल ब्लाऊज परिधान केला होता. तिच्या या लूकवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर कंगनानं क्रितीचं नाव न घेता जाहिरातीतील पोशाखावर प्रश्न उपस्थित केला. रक्षाबंधनासारख्या सणासाठी असे कपडे का निवडण्यात आले, असा सवाल कंगनानं आपल्या पोस्टमधून केला.
रुपाली चाकणकरांवर दिपाली सय्यदने ठोकला 500 कोटींचा दावा? नेमका वाद काय?
कंगनाच्या भूमिकेला उत्तर देताना क्रितीनं सांगितलं की, सणाचा आदर हा व्यक्तीच्या पोशाखावरून ठरवता येत नाही. रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीमधील संरक्षण, प्रेम आणि विश्वासाचं नातं अधोरेखित करणारं पर्व आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिची बहीण एकमेकींना राखी बांधतात आणि एकमेकींच्या आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्यासाठी त्यांच्या श्वानाचाही कुटुंबाचा सदस्य म्हणून या भावनेत समावेश असल्याचं क्रितीनं म्हटलं आहे.
महिलांनी कोणते कपडे घालावेत यावरून त्यांचा सणांप्रती असलेला आदर ठरवणं योग्य आहे का, असा प्रतिप्रश्नही क्रितीनं उपस्थित केला. काळानुसार पारंपरिक पोशाखांमध्ये बदल झाले असून कपड्यांच्या डिझाइनपेक्षा परंपरेबद्दल मनात असलेली भावना महत्त्वाची असल्याचं तिनं म्हटलं. याच मुद्द्यावर कंगनानंही आपली भूमिका मांडताना महिलांकडे आज कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध असताना रक्षाबंधनाच्या जाहिरातीत अशा पोशाखाची निवड का करण्यात आली, असा सवाल केला होता.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी कृतिची पोस्ट शेअर करताना महिलांच्या स्वातंत्र्याबाबत आपली भूमिका मांडली. महिला काय परिधान करते, काय करते किंवा कुठं जाते, हा तिच्या स्वतःच्या निवडीचा विषय आहे, असं त्यांनी म्हटलं. महिलांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल त्यांना ट्रोल करणे थांबवावं, असं आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
