Download App

Ajit Pawar: ‘आज बारामतीत, भेटू…?’ अजित पवारांचा थेट बिग बॉस सूरजला फोन

Ajit Pawar on Suraj Chavhan : अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरजसमोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला.

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : धूमधडाक्यात सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन (Bigg Boss Marathi 5 ) अखेर संपला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) बिग बॉस मराठी 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी बारामतीवर (Baramati) सूरजचं अभिनंदन केलं आहे. तर आज थेट अजितदादांनी सूरजला बारामती दौऱ्याच्या दरम्यान भेट घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

बारामती दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आताच मी सुरज चव्हाणशी फोनवर बोललो. त्याला मी सांगितलं आहे की, मी आज बारामतीत आहे, आपण भेटूया तर तो म्हणाला, मी प्रयत्न करतो…”, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची खास पोस्ट

अजित पवार यांनी आधीचं ट्विटर म्हणजेच, एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की, “आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”


दोन जोडी कपड्यांत आलेला सूरज!

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच सूरजची जोरदार चर्चा होताना दिसली होती. त्याने घरातील इतर स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण, सूरज जेव्हा ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल होती. या शोच्या सेटवर आल्यानंतर त्याला कपडे दिले गेले. या परिस्थितीतून वर आलेल्या सूरजने अल्पावधीतच आपल्या साधेपणाने आणि वागणुकीने सगळ्यांची मने जिंकली.

Bigg Boss Marathi 5 Winner : मोठी बातमी, सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता

सिनेमात झळकणार!

छोट्या खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटी विश्वात स्वतःचे एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस मराठी 5’मुळे सुरज प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला. रियॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर, आता लवकरच तो मोठ्या पडद्यावरही झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज आपल्या आगामी ‘राजाराणी’ सिनेमात आपला दमदार अभिनय करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘राजाराणी’च्या पोस्टरने सर्वांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार आहे, ज्यामध्ये सुरज महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नायकाच्या दोस्ताच्या भूमिकेत त्याला पाहणे फारच रंजक ठरणार आहे. त्याचा ‘राजाराणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us