Ali Fazal On Mirzapur The Movie : मिर्झापूर या गाजलेल्या मालिकेचे जग आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिर्झापूर: द मूव्ही’ प्रदर्शित होणार असून, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी ओटीटी मालिकांपैकी एका मालिकेचे चित्रपटात रूपांतर होणारा हा पहिलाच मोठा प्रयत्न आहे. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘मिर्झापूर: द मूव्ही’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही मालिका आता मोठ्या पडद्यावर नव्या भव्यतेसह सादर होणार आहे. मालिकेतील दमदार ॲक्शन, नाट्य, लक्षवेधी संवाद आणि सत्तासंघर्ष यांचा अनुभव प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी गुड्डू पंडितची भूमिका साकारणारे अली फजल या प्रकल्पाबाबत आपले विचार व्यक्त केले. मालिका ते चित्रपट हा प्रवास कसा वेगळा आहे, याविषयी बोलताना ते म्हणाले, “आम्ही नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. भारतात प्रथमच एखाद्या मालिकेचे चित्रपटात रूपांतर होत आहे. विशेष म्हणजे हा कोणत्याही भागाचा पुढील भाग नसून स्वतंत्र कथा असलेला चित्रपट आहे. पहिल्या पर्वातील मूळ कलाकार पुन्हा एकत्र आले आहेत आणि ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने उलगडते. ज्यांनी ‘मिर्झापूर’ पाहिली नाही त्यांनाही हा चित्रपट सहज समजेल, तर मालिकेचे चाहतेही कथानकातील प्रत्येक गोष्ट योग्य वाटेल अशा पद्धतीने मांडण्यात आली आहे.”
हा बहुप्रतीक्षित चित्रपट मोठ्या प्रमाणावरील ॲक्शन, धक्कादायक वळणे, नव्या कथा आणि सत्तासंघर्षांसह ‘मिर्झापूर’च्या विश्वाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. पंकज त्रिपाठी , अली फजल आणि दिव्येन्दु यांसारखी लोकप्रिय पात्रे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय काही नवीन कलाकार आणि पात्रांचाही समावेश करण्यात आला असून, त्यातून कथानकाला नवे आयाम मिळणार आहेत.
गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
