Announcement of ‘Saranagati’ : ‘KGF’, ‘सालार’ आणि ‘कांतारा’ यांसारखे भारतातील सर्वात मोठे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यापासून ते ‘महावतार नरसिंह’सारख्या वेगळ्या धाटणीच्या कथांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, होम्बळे फिल्म्स भारतीय चित्रपटसृष्टीच्या सीमा सातत्याने विस्तारत आहे. ‘शरणागती’ हा अत्याधुनिक एआय मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला अॅनिमेशनपट आहे.
होम्बळे फिल्म्स आणि ट्रान्सेंडेंटल फिल्म्स यांनी ‘शरणागती – द लाइफ ऑफ अ सरेंडर्ड सोल’ या महत्त्वाकांक्षी अॅनिमेटेड चित्रपटाची घोषणा केली आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) या संस्थेचे संस्थापक-आचार्य परमपूज्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या असामान्य जीवनप्रवासाला आणि आध्यात्मिक कार्याला समर्पित असा हा भव्य सिनेमॅटिक अभिवादनपर चित्रपट आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोशन कॅप्चर (AI Motion Capture) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटर व्हिजन यांची सांगड घालणारे हे उदयोन्मुख तंत्रज्ञान मानवी हालचालींचे डिजिटल अॅनिमेशनमध्ये रूपांतर करते. त्यामुळे अॅनिमेटेड पात्रांच्या हालचाली अधिक प्रभावी, जिवंत आणि वास्तवदर्शी बनतात.
एआय मोशन कॅप्चर तंत्रज्ञानामध्ये कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मानवी हालचालींची नोंद केली जाते. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शरीराची स्थिती, सांध्यांच्या हालचाली, हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव यांचा मागोवा घेतला जातो. या हालचालींशी संबंधित माहितीचे डिजिटल अॅनिमेशन डेटामध्ये रूपांतर करून ती थ्रीडी पात्राच्या डिजिटल सांगाड्याशी जोडली जाते. यामुळे अॅनिमेटेड पात्र मानवी हालचाली हुबेहूब साकारू शकते. नैसर्गिक आणि भावपूर्ण अॅनिमेशनसाठी आवश्यक सुधारणा केल्यानंतर हे तंत्रज्ञान प्रेक्षकांना अधिक immersive आणि प्रभावी दृश्यानुभव देते. तंत्रज्ञान, अॅनिमेशन आणि आध्यात्मिक आशय असलेल्या कथाकथनाचा हा एक अभिनव संगम आहे.
भारतातील आघाडीच्या निर्मिती संस्थांपैकी एक असलेल्या होम्बळे फिल्म्सने नेहमीच पारंपरिक चौकटी मोडणाऱ्या आणि चित्रपटनिर्मितीच्या सीमा विस्तारणाऱ्या कथांवर ठाम विश्वास दाखवला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने या बॅनरने सातत्याने वेगळ्या आशयाच्या कलाकृतींना प्रोत्साहन दिले, महत्त्वाकांक्षी कथांना पाठबळ दिले आणि देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे सिनेमॅटिक अनुभव दिले आहेत. ‘KGF’ फ्रँचायझी, ‘सालार’ आणि ‘कांतारा’ यांसारखे भारतातील सर्वात मोठे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माण करण्यापासून ते भारतातील सर्वात मोठा अॅनिमेशनपट ‘महावतार नरसिंह’ प्रेक्षकांसमोर आणण्यापर्यंत, होम्बळे फिल्म्सने चित्रपटसृष्टीला सातत्याने नवी दिशा दिली आहे.
स्थानिक लोककथा आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या ‘भूत कोला’ला ‘कांतारा’ फ्रँचायझीच्या माध्यमातून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही त्यांच्या वेगळ्या कथा मुख्य प्रवाहात आणण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पारंपरिक चौकटींपलीकडील आशय आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या कथांना प्रोत्साहन देण्याचा हा दृष्टिकोन होम्बळे फिल्म्सच्या दूरदृष्टीची ओळख ठरला आहे.
‘महावतार नरसिंह’च्या उल्लेखनीय यशानंतर होम्बळे फिल्म्स भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सभ्यतेच्या ज्ञानपरंपरेतून प्रेरणा घेणाऱ्या कथांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. ‘शरणागती’च्या माध्यमातून ही निर्मिती संस्था सनातन परंपरेत रुजलेल्या कथा पारंपरिक कथाकथनाच्या चौकटींपलीकडे नेण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी देत आहे. आधुनिक चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कथा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावी, आकर्षक आणि सहजपणे पोहोचवण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे.
कर्नाटकातून आलेल्या गुटख्यावर LCB चा मोठा छापा ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
या चित्रपटात श्रील प्रभुपाद यांच्या असामान्य जीवनप्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. वयाच्या 69व्या वर्षी, 1965 मध्ये त्यांनी भगवद्गीतेतील कालातीत शिकवण आणि भगवान श्रीकृष्णांचा संदेश जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतातून अमेरिकेकडे प्रस्थान केले. त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करत त्यांनी या महान कार्याची सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कृष्णभावनेचा संदेश जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचला. अढळ श्रद्धा, पूर्ण शरणागती, चिकाटी आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेले त्यांचे जीवन आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
गौरा शक्ती दास यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. राजेश सिंह आणि लोहित राव यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून श्रीधर शिकारीपुरा यांनी व्हिज्युअल डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. हा चित्रपट ट्रान्सेंडेंटल फिल्म्सची निर्मिती असून डाइव्ह डीप एआय स्टुडिओच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. होम्बळे फिल्म्स या चित्रपटाचे सादरीकरण करणार असून जगभरात त्याचे वितरणही करणार आहे. श्री नरसिंह चैतन्य मठ, श्रीरंगपट्टण, इस्कॉन बंगळुरू, इस्कॉन आणि भक्तिवेदांत बुक ट्रस्ट (BBT) यांच्या आशीर्वादाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
चित्रपटाच्या अधिकृत शीर्षक घोषणेसह ‘शरणागती’ने पूर्ण समर्पणाच्या भावनेतून जगलेले जीवन आणि पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देणारा आध्यात्मिक वारसा यांचा सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी सुरू केली आहे. श्रील प्रभुपाद यांच्या व्यासपूजेच्या पवित्र आणि मंगलमय मुहूर्तावर, ऑगस्ट 2027 मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
