Download App

अनुराग कश्यपचा ‘निशांची’ : फिल्मी मनोरंजनाला वास्तवाचा ठसका !

‘निशांची’ का पाहावा आणि का टाळावा, याचं थोडक्यात समीक्षण चित्रपट समीक्षक, सोहम ग्रुप डिजिटलचे सीईओ अमित भंडारी यांनी केलंय.

  • Written By: Last Updated:

Nishanchi film review : बॉलीवूडमध्ये वास्तववादी सिनेमांचा अनोखा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा नवीन चित्रपट ‘निशांची’ प्रेक्षकांसमोर आलाय. सिनेमात फिल्मी मसाल्याचं गोडवेगाणं न दाखवता वास्तवाचा डोस पचवून दाखवण्याची किमया कश्यप करतात. मात्र, त्यांची ही शैली कुणाला आवडते तर कुणाला जड जाते. या चित्रपटातही अगदी तेच जाणवतं. ‘निशांची’ का पाहावा आणि का टाळावा, याचं थोडक्यात समीक्षण चित्रपट समीक्षक, सोहम ग्रुप डिजिटलचे सीईओ अमित भंडारी यांनी केलंय.

आयुष्यात फक्त एकच चित्रपट

प्रसिद्ध फ्रेंच फिल्ममेकर आणि पटकथा लेखक जीन रेनोइर यांनी एकदा म्हटले होते, एक दिग्दर्शक (Anurag Kashyap) आयुष्यात फक्त एकच चित्रपट बनवतो; उर्वरित आयुष्यात तो त्या मूळ चित्रपटाची मोडतोड करून पुन्हा ते ते घडवत (Entertainment News) राहतो. काही दशकांपूर्वी महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांच्या एकूण प्रवासाकडे पाहताना या वाक्याचा पुनःप्रत्यय येतो. या आठवड्यात अनुराग कश्यपचा निशांची (Nishanchi) पाहताना पुन्हा या वाक्याची प्रकर्षाने जाणीव होते.

इतरांपेक्षा असलेली वेगळेपणाची झूल

आपल्या काळातील फिल्म मेकिंगमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा अनुराग, आपल्या गँग्स ऑफ वासेपूर या कल्ट सिनेमाच्या तुकड्या-तुकड्यांना उचलून नव्या गुन्हेगारी, सूड आणि भावंडांच्या वैरातून गुंफलेल्या पटकथेत सहजपणे बसवतो. हिंदी पट्ट्यातील पितृसत्ता, राजकारण आणि गुन्हेगारी यांचे जाळे हे नवे नसले तरी कश्यप त्याला एक धारदार सामाजिक रूपक देतो. मानवी स्थितीबद्दल त्याची मांडणी अनेकदा स्टॉक वाटते, परंतु GOW प्रमाणेच तो बॉलीवूडच्या पारंपरिक चौकटी मोडून, त्याच चौकटींना उलथवून एक असा अनुभव देतो जो एका क्षणात मोहवतो. जुन्या समीकरणाला नवीन गृहीतक बनवून पाहतो याची जाणीव होते. तो त्याच्याच फॉर्मुलाच्या चौकटीत अडकतोय की काय? यामुळे क्षणार्धात इतरांपेक्षा असलेली वेगळेपणाची झूल आपल्या नजरेतून गळून पडायला लागते.

अनुराग फ्लॅशबॅकचे दार उघडतो तेव्हाच…

निशांची बघतानाअंधा कानून, सरकार आणि बागबान यांच्या कोलाजची आठवण येत राहते. कथेचा गाभा बबलू (ऐश्वर्य ठाकरे), त्याचा जुळा डब्लू आणि रिंकू (वेदिका पिंटो) यांच्याभोवती फिरतो. संवादातील चमकदारपणा उत्तरेकडील ग्रामीण भागाच्या त्या हेलची एक वेगळी गंमत आहे. काही ठिकाणी मात्र प्रसंगांची अनावश्यक लांबी जाणवते. बँक दरोड्यानंतर बबलू तुरुंगात पोहोचतो. डब्लूला रिंकूच्या जवळ जाण्याची संधी मिळते. पण खरी जादू अनुराग फ्लॅशबॅकचे दार उघडतो तेव्हाच सुरू होते…

मग या नाट्यात येतो तो जबरदस्त (विनीत कुमार सिंग) – प्रतिभावान कुस्तीगीर, निष्ठावंत मित्र आणि सत्तेच्या डावपेचांचा बळी. त्याचा गुरू (राजेश कुमार) आणि कपटी अंबिका (कुमुद मिश्रा) त्याच्या आयुष्याला सापळ्यात ओढतात. या सगळ्या कटकारस्थानात मंजरी (मोनिका पनवार) ही ज्वलंत स्त्री, एकेकाळची ट्रॅप शुटिंग चॅम्पियन, अंबिकाच्या वर्चस्वाला आव्हान देते. पण बबलूला त्याच्या गुरूच्या सावटातून मुक्त करू शकत नाही. बालगुन्हेगार म्हणून तुरुंगातून सुटलेला बबलू जेव्हा घर सांभाळायला परततो. तेव्हा त्याला कळते की, त्याचा गुरूच त्याच्या प्रेमामध्ये अडथळा बनून उभा आहे.

गुंतलेले सूड नाट्य

निशांचीतल्या अनेक गोष्टी पूर्वी पडद्यावर उमटल्या आहेत, पण कश्यप त्यांना एक रंगीबेरंगी टेपेस्ट्रीसारखे विणतो. बबलू आणि रिंकूतील अस्वस्थ केमिस्ट्री, कावेबाज मित्राचा धूर्तपणा, जुळ्या भावामध्ये उमलणारे निषिद्ध आकर्षण – हे सगळे क्षण कश्यप आपल्या खास धाडसी भाषेत उलगडतो. फिल्मी असला तरी माणसे हाडामासाची आहेत जिवंतपणे रसरसलेली पात्र आहेत. त्यांच्यातल्या व्यामिश्र नात्यातली गुंतागुंत जगण्यातली रस्सीखेच भावना वासना प्रेम आकर्षण या सगळ्यांच्या मिश्रणातील चक्रव्यूहात गुंतलेला गुंतलेले सूड नाट्य यामुळे या सिनेमातील रंजकता वाढते.

सिनेमाची गाणी हा एक भन्नाट विषय आहे. रूढार्थाने गाणी या संकल्पनेलाच छेद देत प्रयोगाच्या नव्या कक्षा रुंदावू पाहणारी या सिनेमातील गाणी आहेत. या सिनेमातील संवाद रंजक आहेत. कधी कधी त्यातील दाहकता जाणवतं. फेमिनिझम आणि त्याबद्दलचे वास्तव दाखवणाऱ्या आणि एकूणच फिली स्टाईल या लिखाणाच्या शैलीत गंमत आहे. एखादा चटका लागल्यासारखा हा सिनेमा आपल्याला वेळोवेळी भानावर आणतो.

अनुराग कश्यपच्या सिनेमाचा मूळ प्रवाह

मोनिका पनवारने मंजरीला दिलेला जिवंतपणा हे चित्रपटाचे शक्तिस्थान आहे. एक पॉवरहाऊस परफॉर्मन्स, ज्यात ताकद आणि नाजूकता दोन्ही आहे. वेदिका पिंटोही प्रभावी आहे, जरी तिच्या भूमिकेत हुमा कुरेशीच्या सावलीचा भास टाळता आला असता. अनुराग कश्यपच्या सिनेमाचा मूळ प्रवाह कायम राहिला आहे – मोडून, पुन्हा बांधून आणि प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घुमणारा. पण तरीही नव्या प्रवाहाची रचना करणारा नवीन काहीतरी शोधू पाहणारा अनुराग आपल्याच यशस्वी फॉर्मुल्याच्या प्रेमात पुन्हा असल्याची जाणीव करून दिल्याशिवाय निशांची पुढे जात नाही…

का पाहावा अनुराग कश्यप च्या ट्रीटमेंटसाठी

का टाळावा स्वतःच्याच प्रेमात असलेला अनुराग कश्यप आवडत नसेल तर

थोडक्यात काय फिल्मी मनोरंजनाचा वास्तववादी डोस…

या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स – अमित भंडारी, चित्रपट समीक्षक, सोहम ग्रुप डिजिटल सीईओ

follow us