Arjun Rampal marries Gabriella Demetriades in Goa: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. पहिल्या पत्नीपासून दोन मुले असताना 53 व्या वर्षी अर्जुन रामपालने मॉडेल-उद्योजिका गॅब्रिएला डेमेट्रिएड्सबरोबर (Gabriella Demetriades) अखेर गोव्यात विवाह केला आहे. मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात त्यांच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. विशेष परवानगी मिळाल्याने स्थानिक कायद्यानुसार आवश्यक असलेला 15 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी टाळून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
अर्जुन आणि गॅब्रिएला 2018 पासून नात्यामध्ये आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांच्या नात्याला आता नवे नाव मिळाले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी उत्तर गोव्यातील मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात विवाहाची नोंदणी केली. स्थानिक न्यायालयाच्या सहाय्यक सरकारी वकिलांकडून त्यांना विशेष परवानगी मिळाली होती. त्यामुळे विवाहाच्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेला 15 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी माफ करण्यात आला. सब-रजिस्ट्रार सूरज वेर्णेकर यांनी या विवाहाची नोंदणी गोव्याच्या समान नागरी कायद्यानुसार (Uniform Civil Code) झाल्याची माहिती दिलीय. अर्जुन आणि गॅब्रिएला शुक्रवारी दुपारी सुमारे चार वाजता रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचले. यावेळी दोघांनीही साधा आणि कॅज्युअल लूक ठेवला होता.
अर्जुन आणि गॅब्रिएलाची लव्हस्टोरी
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स 2018 पासून एकत्र आहेत. अर्जुनचे त्यांची पहिली पत्नी आणि माजी मॉडेल मेहर जेसियापासून विभक्त झाल्यानंतर गॅब्रिएलासोबतचे नाते समोर आले. या नात्यातून 2019 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा अरिकचा जन्म झाला. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये या जोडप्याला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव अरिव ठेवण्यात आले. अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी आपल्या नात्याबद्दल कधीही फारशी गुप्तता ठेवली नाही. काही काळापूर्वी अर्जुनने गॅब्रिएलासोबत साखरपुडा झाल्याचेही जाहीर केले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना अर्जुनने त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत माहिती दिली होती.
जुन्या वादातून धीरज परदेशीचा काटा काढला; मुख्य आरोपीने उलगडला हत्येचा कट
कोण आहे गॅब्रिएला डेमेट्रिएड्स?
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही दक्षिण आफ्रिकेतील मॉडेल, फॅशन डिझायनर आणि उद्योजिका आहे. फॅशन क्षेत्रासोबतच तिने मनोरंजन क्षेत्रातही काम केले आहे. गॅब्रिएलाचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील ग्केबरहा येथे झाला. या शहराला पूर्वी पोर्ट एलिझाबेथ म्हणून ओळखले जात होते. तिने अवघ्या 16व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली.
अर्जुन रामपालचे पहिले लग्न
गॅब्रिएलापूर्वी अर्जुन रामपालने माजी मॉडेल मेहर जेसियासोबत लग्न केले होते. दोघांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. या दाम्पत्याला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. अर्जुन आणि मेहर यांनी 2018 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.
