‘Bandhu’ to be the opening film at ‘Chitrapataka-2026’ on Sunday : सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या ‘चित्रपताका’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन रविवारी, 15 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून या चार दिवसीय महोत्सवाची सुरुवात ‘बंधू’ या अद्याप अप्रदर्शित असलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाने होणार आहे.
‘चित्रपताका–2026’ यंदा दुसरे पर्व असून प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवात मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याबरोबरच चित्रपटविषयक विविध पैलूंवर संवाद, चर्चा आणि विचारमंथन करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता रवींद्र नाट्यमंदिराच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता नितीन सुपेकर दिग्दर्शित ‘बंधू’ हा उद्घाटकीय चित्रपट प्रदर्शित होईल. उपेंद्र लिमये व जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन भावांमधील नातेसंबंध, प्रेम, संघर्ष, जिव्हाळा आणि त्याग यांची भावस्पर्शी कथा मांडतो. अद्याप अप्रदर्शित असलेला हा सिनेमा पाहण्याची संधी या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांना मिळणार असून महोत्सवाच्या चार दिवसांत असे 33 आशयघन सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे.
एमपीएससी परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी! प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हा महोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, आशय-विषयांची विविधता, चित्रपट निर्मितीतील नवे तंत्रज्ञान, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, जाहिरात आणि वितरण अशा विविध विषयांचा वेध संवादसत्रांमधून घेतला जाणार आहे. 7 परिसंवाद, 4 विशेष मुलाखती आणि कार्यशाळांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्वे आणि नव्या पिढीतील चित्रपटकर्मी यांच्यात संवादाचा पूल उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती हे या महोत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चित्रपट अभ्यासक सहभागी होणार आहेत. महोत्सवपूर्ण नोंदणीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी सिनेमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
विविध विषय, वेगवेगळ्या शैली, नव्या दिग्दर्शकांचे प्रयोग आणि प्रस्थापित चित्रपटकर्मींच्या कलाकृती अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर मराठी चित्रपटांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक आशयाचेही दर्शन घडणार आहे. महोत्सवासाठी प्रेक्षकांकडून आकारण्यात येणारे चार दिवसांचे 100 रुपये नोंदणी शुल्क संपूर्णपणे दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपात प्रशांत किशोरांची उडी; म्हणाले, ‘पेगॅसस’ प्रकरणात माझाही फोन टॅप झाला होता!
त्यामुळे मराठी चित्रपटांचा आनंद घेतानाच दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे, असे सांगत मराठी चित्रपटसृष्टीच्या कलात्मक वाटचालीचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवात चित्रपटप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे. महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक, चित्रपट प्रदर्शनाच्या वेळा आणि नोंदणीची माहिती www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
