11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय

‘देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची’ सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला.

Untitled Design 34 2

Untitled Design 34 2

Blockbuster entry of ‘Deul Band 2’ : 2013 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे.

पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः गर्दी केली.राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.

मुंबईतील मराठीबहुल भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ परिसरातही ‘देऊळ बंद 2’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. या भागातील अनेक थिएटरचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून, तिकीट खिडक्यांवर गर्दी झाली आहे. ‘बुक माय शो’ या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद 2’ची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे.

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट? संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते.

वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या भव्य चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरला आहे. प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.

पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील 500 सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे 2 हजारांहून अधिक शो प्रदर्शित झाले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये ‘देऊळ बंद 2’चे तब्बल 25 शो हाऊसफुल्ल झाले आहेत. एका मराठी चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा सुरू आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपट प्रदर्शित करताना मध्यरात्रीचे शो, विशेष मुहूर्त किंवा पारंपरिक दिवसांऐवजी वेगळ्या दिवशी रिलीज करण्याचे प्रयोग केले जातात. त्याच धर्तीवर ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट पारंपरिक शुक्रवारऐवजी थेट गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रयोगालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली आणि मराठी सिनेमातील सर्वात चर्चित व दमदार ओपनिंगपैकी एक ओपनिंग चित्रपटाला मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

Exit mobile version