प्रशांत गोडसे, मुंबई
Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर चाकू (Saif Ali Khan) हल्ला झाला. चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी त्याच्या घरात घुसला आणि सैफवर सपासप वार केले. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या (Mumbai Police) प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्वात आधी त्याच्या घरात काम करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, सैफच्या घरी क्राइम ब्रँचचे अधिकारी दाखल झाले आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि पोलीस अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि इतरांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आता तिथे या तिघांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी सैफच्या घरातील मोलकरणीवर हल्ला झाला. या हल्ल्यात मोलकरीण किरकोळ जखमी झाली. वाद ऐकून सैफ तिथे आला. त्याने हल्लेखोराला समजावण्याचा त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
सैफवर जीवघेणा हल्ला; हे लोलो..ऑल ओके? खासदार सुप्रिया सुळेंचा थेट करिश्मा कपूरला फोन
परंतु, हल्लेखोर चिडला आणि त्याने रागाच्या भरात सैफवर हातातील धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी दोघांत झटापटही झाली. या हल्ल्यात सैफवर एकूण सहा जखमा झाल्या आहेत. मानेवरील जखम दहा सेंटीमीटर खोल आहे. तर दुसरी जखम पाठीच्या मणक्याजवळ झाली आहे. या दोन्ही जखमा गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातून टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, या हल्ल्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घरातील अन्य सदस्य सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी घटनेची खात्री केल्यानंतर अधिकृत निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. घटना कशी घडली, हल्लेखोर बाहेरील होता की आधीच घरात होता याचाही तपास केला जात आहे. हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
सैफ अली खानच्या पीआर टीमनेही या घटनेबाबत एक निवेदन दिलं आहे. यानुसार सैफच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिडिया आणि चाहत्यांनी संयम बाळगावा. हा प्रकार पोलीस केस आहे. आम्ही आपलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती देत राहू असे पीआर टीमने म्हटले आहे. करिना कपूरच्या पीआर टीमनेही निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.
पाइपलाइनच्या मदतीने घुसखोरी, मोलकरणीशी वाद अन् सैफवर हल्ला.. घरात काय घडलं?
सिने अभिनेता सैफ अली खानच्या घरी त्याचा मुलगा जहांगीरच्या बेडरूममध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अनोळखी इसम त्यांच्या घरातील मोलकरणीला दिसला. त्यामुळे तिने आरडाओरड केली. त्यावेळेस सैफ अली खान पुढे आला. तेव्हा सदर इसमाने त्यांच्यावर कोणत्या तरी टोकदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला. मोलकरीणही किरकोळ जखमी झाली आहे. सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळाली आहे.