CM Fadnavis Unveiled Trophy Of Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar : ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ ( Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar ) भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा केली. त्यानंतर सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधून 108 सहभागींसह, सुरु होणारा हा शो (Reality Show) महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) उपस्थितीत नुकतच संपन्न झालं. याप्रसंगी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी, विविध संतांचे वंशज, या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालक गीतकार ईश्वर अंधारे आणि परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील आणि ह.भ.प. राधाताई सानप आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. राधाताई सानप यांनी त्यांच्या कीर्तनातून शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रात सामाजिक जागरूकता निर्माण करून महासांगवी संस्थानला वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. तर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी कीर्तनातून शिक्षण आणि सामाजिक जागरूकता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. भक्तीचे पावित्र्य जपत ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी आणि परंपरा जपल्याबद्दल महाराष्ट्रातील आदरणीय संतांच्या सर्व वंशजांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.
ह.भ.प. माधव महाराज नामदास, पंढरपूर (संत नामदेव महाराजांचे वंशज), ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर, ह.भ.प. जब्बार महाराज शेख (संत शेख महंमद यांचे वंशज), ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, देहू (संत तुकाराम महाराजांचे वंशज), ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, सुदुंबरे (संताजी जगनाडे महाराजांचे वंशज), ह.भ.प. गोपाळबुवा मकाशिर, पिंपळनेर (निळोबाराय महाराजांचे वंशज), ह.भ.प. प्रमोद पाठक, शिऊर (संत बहिणाबाईंचे वंशज) या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.
7 कोटी 79 लाख जमा… ज्यूस विक्रेत्याला आयकर विभागाची नोटीस, मग घडलं भयंकर
याप्रसंगी बोलताना माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. सोनी मराठी वाहिनीने अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना मांडली आहे. आज या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आशीर्वाद महत्तवाचे असून या सगळ्यांचे मनापासून आभार की या अतिशय सुंदर संकल्पनेला या सर्वांचा पाठिंबा लाभला आहे. आमची समृद्ध अशी जुनी कीर्तन परंपरा आहे. आजच्या कीर्तनकारांनी आपल्या निरूपणातून, कीर्तनातून समाजाला चांगले विचार देत केलेलं समाजप्रबोधन हे खऱ्या अवर्णनीय आहे. जग इतक्या झपाट्याने पुढे चाललं आहे त्यावेळेस लोकांना प्रश्न पडायचा आपली समृद्ध परंपरा जिवंत राहील का? पण ज्यावेळेस मी अशा प्रकारचे अतिशय तरुण कीर्तनकार पाहतो, त्यावेळेस मला खात्री वाटते की आमची सनातन परंपरा कधीच संपू शकत नाही, तिचा नाश होऊ शकतं नाही.
महाराष्ट्राचा समृद्ध आध्यात्मिक वारसा ही महाराष्ट्राची ताकद आहे, कीर्तन या परंपरेचा आत्मा आहे. कीर्तन परंपरेने भक्तिरसपूर्ण आणि रसाळ कथाकथनाच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या लोकांचे प्रबोधन केलंय. त्यांचे उत्थान केले आहे आणि त्यांना एकत्र आणलंय. या परंपरेचा सन्मान करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा मंच सादर केल्याबद्दल मी सोनी मराठी वाहिनीचे मनापासून कौतुक करतो. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा केवळ एक शो नाही तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे, जी महाराष्ट्राचा पवित्र वारसा जिवंत ठेवेल. त्याची भरभराट करेल.
याप्रसंगी बोलताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी म्हणाले की, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने कायमच खोलवर परिणाम साधणाऱ्या प्रामणिक कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर हा महाराष्ट्राचा अध्यात्मिक वारसा सांगणारा अनोखा उत्सव आहे. कीर्तन हे तमाम भारतीयांच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनाचे भरणपोषण करणारे महत्त्वाचे केंद्र आहे.